बारामती, 22 ऑक्टोबर : बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे आज (दि. 22) एक दिवस इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरती असून सुळे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील 72 कोटी 33 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी ‘माझा मतदार संघ, माझा अभिमान’ या अभियानातंर्गत राज्यस्तरीय गुणवंत खेळाडूंशी संवाद साधला. याचबरोबर राष्ट्रवादीचे माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मतदार संघातील कामांच्या आढावा घेतला. तसेच केंद्र सरकार आणि राज्याच्या समन्वयाबाबतही त्यांनी चर्चा केली.
खासदार सुळे म्हणाल्या कि, महाविकास आघाडीत दत्तात्रय भरणे हे मंत्री होते. त्यांचा अर्धा वेळ मुंबईत तर अर्धा वेळ इंदापूरात त्यातून दोन तीन दिवस मंत्रालय तर दोन तीन दिवस सोलापूरमध्ये जायचा. मात्र मी जेव्हा विकासकामांचा आढावा घेते तेव्हा विचार करते की मामा एक सुपरमॅन होते. महाविकास आघाडी काळात दत्तात्रय भरणे यांनी सर्वच जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली असल्याने त्यांचा डेटा जनतेने तपासून पहावा असे त्या म्हणाल्या.
हे ही वाचा : ‘मुंबईच्या ठाकरेंची आजही दहशत, NCP च्या नादाला लागाल तर हात…’, देवेंद्र भुयार यांचा थेट इशारा
तसेच केंद्र सरकार आमचे वैरी नाहीत आमच्यात केवळ वैचारिक मतभेद आहेत. जल जीवन मिशनमध्ये केंद्राचा पन्नास टक्के वाटा आहे त्याबद्दल त्यांचे आभार. पण उरलेला पन्नास टक्के वाटा हा महाविकास आघाडी सरकारचा आहे त्या चेकवर तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांची सही आहे. हे मान्य करावं लागेल असं ही सुळे म्हणाल्या आहेत. दरम्यान महाविकास आघाडी काळात झालेल्या कामांचे श्रेय आताच्या सरकारने घेऊ नये असाच सुप्रीय सुळेंचा रोख होता.
इंदापुरात विकासकामांचा धुमधडाका
श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना -उदमाईवाडी-घोलपवाडी-उद्घट - पवारवाडी या रस्त्याच्या कामासाठी 11 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. बंबाडवाडी-चव्हाणवाडी-परीटवाडी ते फडतरे नॉलेज सिटी कळंब या रस्त्याच्या कामासाठी 8 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
हे ही वाचा : VIDEO: पुण्याजवळ वाहतूक कोंडीत अडकल्या सुप्रिया सुळे, वैतागून गाडीतून उतरल्या अन्…, पाहा पुढे काय घडलं
शेळगाव बसस्थानक -शिरसटवाडी ते निमसाखर रस्ता करण्यासाठी 12 कोटी 35 लाख, शिरसटवाडी जलजीवन मशिनतंर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी 1कोटी 47 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे.तसेच माळवाडी-ठाकरवाडी-पेटकरवस्ती-चिंदादेवी -अजोती-सुगाव-पडस्थळ रस्त्यासाठी 18 कोटी रुपयांची निधी मंजूर आहे. अजोती-सुगाव जलजीवन पाणीपुरवठा योजना व इतर विकास कामांसाठी 3 कोटी ५४ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे.
सणसर फाटा ते काझड रस्ता करण्यासाठी 15 कोटी ,जाचकवस्ती जलजीवन मशिनतंर्गत नळपाणी पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी 33 लाख रुपये मंजूर असून या विकासकामांचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात आले.