चांदणी चौकातील पूल स्फोटामध्ये सहज पडला नाही.
पुणे, 8 ऑक्टोबर : पुण्यातील चांदणी चौकातील पूल पडण्याची घटना हा देशपातळीवरील चर्चेचा विषय बनली होती. या पुलामुळे होणारी वाहतूक कोंडी, पूल पाडण्यासाठी लागणारी यंत्रणा, पर्यायी मार्गांचा वापर या सर्व गोष्टींवर सर्वत्र मोठी चर्चा झाली. या पुलाबाबतचे जोक देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 600 किलोंची स्फोटकं लावूनही हा पूल सुरूवातीला पूर्ण पडला नाही. त्यामुळे हा पूल कुणी बांधला? याची सर्वांमध्ये मोठी उत्सुकता होती . हा पूल बांधणारे इंजिनिअर सतीश मराठे यांच्याशी ‘News 18 लोकमत’ने या विषयावर खास बातचित केली. अत्याधुनिक स्फोटकांचा वापर केल्यानंतरही हा पूल सहज पडला नाही, ही आमच्या कामाची पोचपावती असल्याची प्रतिक्रिया मराठे यांनी दिली आहे. कसे झाले पुलाचे बांधकाम? सतीश मराठे यांनी अमेरिकेत सिव्हिल इंजिनिअचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी तिकडे तीन वर्ष प्रॅक्टीस केली. त्या कालावधीत अमेरिकेत उभारलेल्या वेगवेगळ्या पुलांच्या निर्मितीमध्येही मराठे यांचे योगदान होते. अमेरिकेतून भारतामध्ये परतल्यानंतर आपण पुण्यात करिअरला सुरूवात केली. सतीश मराठे आणि अनंत लिमये यांच्या बार्ली कंपनीने 1992 साली चांदणी चौकातील पूल बांधला. ‘हा पूल बांधण्यासाठी सुमारे साडेचार महिने लागले. या पुलाचे बांधकाम सुरू असतानाच त्या भागात महामार्गाचेही काम सुरू होते. त्यामुळे आम्हाला काम लवकर करण्याचे आदेश देण्यात आले होते. 20 ते 25 लाख रूपये खर्च करून या पुलाचे बांधकाम झाले,’ असे मराठे यांनी सांगितले. VIDEO: रस्त्यावर ही चूक करत असाल तर सावधान, पुण्यात फुटबॉलप्रमाणे हवेत उडून खाली कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू ‘आमच्या कामाची पोचपावती’ मराठे यांनी चांदणी चौकातील पुलासह वेगवेगळ्या भागात एकूण 25 पूल बांधले आहेत. कोणतीही बांधकाम करताना त्यामध्ये योग्य सिमेंट,योग्य वाळू आणि आवश्यक तेवढे स्टील वापरले पाहिजे. त्याचबरोबर कामाचे नियोजन आणि त्याबद्दलची निष्ठा असणे आवश्यक आहे. आम्हाला फक्त चांगले काम करायचं आहे, या उद्देशानं आम्ही आत्तापर्यंत काम करत आलो आहोत. इतकी सर्व स्फोटकं लावूनही पूल पडला नाही, ही आम्हाला आमच्या चांगल्या कामासाठी मिळालेली पोचपावतीच आहे, असे मराठे यांनी स्पष्ट केले.
आम्ही बांधलेले आतापर्यंतचे सर्व पूल आजही सुस्थितीमध्ये आहेत. या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. मी माझ्या आयुष्यातील पहिला पूल 40 वर्षांपूर्वी बांधला होता. त्याचा फोटो एका व्यक्तीने मला पाठवला होता. तो पूल आजही तसाच आहे, अशी आठवण मराठे यांनी यावेळी सांगितली.