मीरा रोड, 06 नोव्हेंबर: मोकळ्या सरकारी जागेत पत्ते खेळणाऱ्या तरुणांना येथे पत्ते खेळू नका (prevent to playing cards), असं सांगितल्याने चार जणांनी एका स्थानिक रहिवाशाला आणि त्याच्या मुलाला बेदम मारहाण (Father and son beaten by group) केली आहे. आरोपींनी बापलेकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण (Attack with iron rod) करत गंभीर जखमी केलं आहे. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात मारहाण आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. अशोककुमार मिश्रा आणि आलोक मिश्रा असं मारहाण झालेल्या बापलेकाचं नाव असून ते भाईंदर येथील गणेश देवल नगर परिसरातील शिमला गल्लीत राहतात. फिर्यादी मिश्रा यांच्या घराशेजारी मोकळी सरकारी जमीन आहे. याठिकाणी काही तरुण पत्ते खेळण्यासाठी येतात. दरम्यान, 5 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास या मोकळ्या जागेत काही तरुण पत्ते खेळत होते. यावेळी मिश्रा यांनी येथे पत्ते खेळू नका असं सांगितलं. पत्ते खेळताना हटकल्याने संबंधित तरुणाना राग आला. हेही वाचा- सख्खा भाऊच जीवावर उठला; ऐन दिवाळीत धाकट्यावर कुऱ्हाडीने घाव घालत केला खेळ खल्लास यातूनच चार जणांनी मिश्रा यांना ‘तू पोलिसांचा खबरी आहेस’ असं म्हणत शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली. वडिलांना होणारी मारहाण पाहून मुलगा आलोक वडिलांना वाचवण्यासाठी भांडणात गेला. यावेळी आरोपींनी मुलालाही मारहाण केली आहे. यावेळी आरोपी राज तिवारी याने लोखंडी रॉडने मिश्रा यांच्या डोक्यात जबरी वार केला. हेही वाचा- मामाच्या गावाला जाताना बहीण-भावावर काळाचा घाला; भाऊबीजेआधीच झाला हृदयद्रावक शेवट यावेळी आरडाओरड झाल्याने मिश्रा यांची पत्नी आणि शेजारी राहणारे अनेक नागरीक घटनास्थळी दाखल झाले. संबंधित सर्वांनी मिश्रा पिता-पुत्रास आरोपींच्या तावडीतून सोडवलं. या मारहाणीत आलोकला चांगलीच दुखापत झाली आहे. याप्रकरणी मिश्रा यांनी आरोपी राज तिवारी याच्यासह अन्या तिघांविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.