अहमदनगर, 6 मार्च : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील बेलापूर येथील व्यापाऱ्याचे 5 दिवसापूर्वी अपहरण (Kidnapping of a Trader) झाल्याची घटना घडली आहे. गेल्या पाच दिवसांपासून तपास लागत नसल्याने आज गाव बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. तसंच या घटनेचा लवकर तपासा करावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. बेलापूर गावातील व्यापारी गौतम हिरण बेपत्ता होवून आज पाच दिवस उलटले. मात्र तरीही पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा लागला नाही, अशी स्थिती आहे. भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. मुंबईत एका महत्त्वाच्या प्रकरणाशी संबंधित व्यक्तीचा मृतदेह संशयित अवस्थेत आढळल्याने सरकारवर टीका केली जात असतानाच अहमदनगरमधील व्यापाऱ्याच्या अपहरण प्रकरणामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पोलिसांनी मात्र याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता केवळ तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. केवळ गौतम हिरण यांना एका गाडीत घेऊन गेल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना आहे. हेही वाचा - मुंबईत एकाच दिवशी 2 आत्महत्या, 10 वीत शिकणाऱ्या मुलीने इमारतीवरून मारली उडी आता या व्यापाऱ्याशी संबंधित प्रकरणाचा तपास करणे हे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. जर सदर व्यापाऱ्याचं अपहरण झालं असेल तर गेल्या पाच दिवसात अजूनही पैशाची कोणतीही मागणी झालेली नाही. त्यामुळे हे अपहरण आहे की अजून काही असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्वच प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासानंतर समोर असल्याने पोलिसांनी वेगवान तपास करावा, अशी मागणी व्यापाऱ्याच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे.