राहुल पाटील (पालघर), 28 जानेवारी : पालघर समुद्र किनाऱ्यावर काल पोलिसांच्या गस्त बोटीचा अपघात झाला. पालघर पोलीस गस्त घालत असताना अचानक बोट बुडाली यामुळे एकच खळबळ माजली होती. दरम्यान याबाबत तातडीने बुडालेल्या बोटीच्या मदतीसाठी स्थानिक मच्छीमारांच्या बोटीच्या मदतीने गस्त घालणारी पोलिसांसह बोट किनाऱ्यावर आणण्यात यश आले आहे. दरम्यान मागच्या 15 दिवसांपूर्वी पालघरमध्ये 15 प्रवाशांसह बोट बुडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस विभागाची समुद्रात पेट्रोलिंगसाठी अशोका बोट गेली होती. दरम्यान ही बोट अचानक बुडत असल्याचे समजताच केळवे पोलीस ठाण्याचे सपोनि भीमसेन गायकवाड यांनी स्थानिक मच्छीमारांना मदतीसाठी हाक दिली. या सहाय्याने समुद्रात जाऊन त्यांना मदत करीत सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात यश मिळविले.
हे ही वाचा - ‘‘मला अजून जगायचय….’’ असं लिहित महिलनं घेतला टोकाचा निर्णय, पण का?
समुद्रात केळवे ते दातीवरे ह्या भागात पेट्रोलिंग करण्यासाठी गेलेली अशोका बोट दातीवरे गावाच्या समोर समुद्रात 7 नोटिकल भागात गेल्यावर बोटीत हळूहळू पाणी शिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. आपल्या स्पीड बोटीमध्ये अर्ध्यावर पाणी शिरू लागल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी पाणी पिण्याच्या बाटल्या कापून त्या द्वारे बोटीत शिरलेले पाणी काढण्यास सुरुवात केली.
मात्र समुद्रात सुरू असलेल्या जोरदार वाऱ्यामुळे तुफानी लाटा उसळत होत्या. तसेच बोट लाटांवर हेलकावे घेत असल्याने बोटीतील पाणी बाहेर काढणे शक्य होत न्हवते. ह्याच वेळी त्यांच्या स्पीड बोटीतून त्यांचे लाईफ जॅकेट सह अन्य साहित्य वाहून गेले. बोटीतील एका अधिकाऱ्याने केळवे सागरी पोलीस ठाण्याचे सपोनि गायकवाड ह्यांच्या मोबाईलवर संपर्क साधत मदत मागितली.
तत्काळ गायकवाड ह्यानी आपले सहकारी कॉन्स्टेबल जयदीप सांबरे, वसंत वळवी, पी सी साळुंखे आदी कर्मचाऱ्यांना सोबत घेत लमांगेल वाडीतील हर्षल मेहेर, राकेश मेहर, आतिश मेहेर, रितेश मेहेर, चंद्रकांत तांडेल आणि रुपेश बंगारा यांच्यासोबत त्यांची लक्ष्मीप्रसाद बोट समुद्रात रवाना केली.
हे ही वाचा : नवऱ्याचे होते अफेअर, संतापलेल्या पत्नीने रचला भयानक प्लान, गाढ झोपेत दिली वेदनादायक शिक्षा
समुद्रात वादळी वारे आणि मोठ्या लाटा उसळत असताना मच्छीमारांनी मोठ्या हिमतीने तासभर प्रवास करत त्या दुर्घटना ग्रस्त बोटीचा शोध घेतला. समुद्रात भरती असल्याने ही बोट भरतीच्या प्रवाहाने दातीवरे गावाकडून टेम्भी गावाच्या समोर वाहत आली होती. मदतीसाठी बोट पोहचल्यावर बुडत असलेल्या अशोका बोटीतील पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सर्वांच्या मदतीने अशोका बोटीत जमलेले पाणी बाहेर काढण्यात सर्वांच्या प्रयत्नांना यश आलं. आणि अथक प्रयत्ना नंतर अशोका बोट आणि त्यातील चार कर्मचाऱ्यांना सुखरूप केळवेच्या किनाऱ्यावर आणण्यात सर्वांना यश आले.