आंबेडकरांचा नामांतराचा विरोध मावळला
उस्मानाबाद, 27 जानेवारी : ठाकरे गटासोबत युती करताच उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या नामांतराचा प्रकाश आंबेडकर यांचा विरोध मावळल्याचं पाहायला मिळत आहे. “एकदा विधानसभेत नामांतराचा कायदा झाला की तो कायदा आपण मंजूर करायचा असतो. विरोध आपण केला. पण, तो विरोध नाव किंवा त्याबद्दलचा कायदा होण्यापूर्वी होता. आता विधानसभेत त्याबाबत ठराव झालेला आहे. त्यामुळे त्याला आता आमचा कसलाही विरोध नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर आज उस्मानाबाद आले असता पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. प्रकाश आंबेडकरांचा होता नामांतराला विरोध औरंगाबाद आणि उस्मानाबाद दोन्ही शहराच्या नामांतराला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा विरोधत होता. मात्र, युतीनंतर त्यांचा विरोध मावळल्याचे पाहायला मिळाले आहे. औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव नाव करण्याचा निर्णय शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला होता. यासह नवी मुंबई विमानतळाला दी. बा. पाटील हे नाव देण्याचा निर्णय झाला होता. या ठरावाला अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंजुरी देण्यात आली आहे. आता प्रकाश आंबेडकर यांनी देखील विरोधाचं निशाण खाली घेतल्याचं दिसतंय. वाचा - नाशकात भाजपला धक्का; बडा नेता ठाकरे गटाच्या गळाला; आज होणार पक्षप्रवेश ही आघाडी फक्त भाजपला विरोध करण्यासाठी : फडणवीस उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीचे राजकारणात फारसे परिणाम होतील असे मला वाटत नाही. कारण ही आघाडी फक्त भाजपला विरोध करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना यांच्यातील वैचारिक अंतर सर्वाना माहित आहे. ज्यावेळी मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार झाला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यायचं होते. त्यावेळी त्याला भाजपने पाठिंबा दिला होता. मात्र, याचवेळी शिवसेनेने नामविस्ताराला विरोध केला होता. आता त्याच शिवसेनेसोबत प्रकाश आंबेडकर गेले आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. प्रकाश आंबेडकर सतत अकोल्यातून निवडणूक लढले. मात्र, ते काही जिंकून येऊ शकले नाहीत. त्यामुळे कदाचित त्यांना वाटत असेल की, शिवसेना आपल्यासोबत आल्यावर हिंदुत्ववादी मते आपल्यासोबत येतील. पण त्यांना माहित नाही की, हिंदुत्ववादी मतदारांनी शिवसेनेची साथ आधीच सोडलेली आहे. कारण शिवसनेने हिंदुत्व सोडले असल्याने हिंदुत्ववादी मते त्यांच्यासोबत राहणार कशी? असा प्रश्न देखील फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.
निझाम आणि मुघलांच्या नावावरून ठेवण्यात आली होती या शहरांची नावं गेल्या अनेक वर्षांपासून औंरगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव नाव करण्यात यावं, अशी मागणी जोर धरत होती. प्रामुख्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ही आग्रही मागणी होती. शेवटचे निझाम मीर उस्मान अली यांच्या नावावरून उस्मानाबाद तर मुघल बादशाह औरंगजेब याच्यावरून औरंगाबाद असे या शहराचे नावं पडले होते. त्यामुळे अनेकांचा याला विरोध होता.