मुंबई, 27 जानेवारी : काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत मतभेद आज पुन्हा एकदा समोर आले आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची आज मुंबईत (Mumbai) बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), अशोक चव्हाण (Ashok Chavan), पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांच्यासह आणखी काही नेते उपस्थित होते. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील (H K Patil) यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. पण या बैठकीचं निमंत्रण मिळालं नाही म्हणून ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) हे नाराज होऊन बैठकीत उपस्थित न राहता माघारी परतले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. या चर्चेवर नितीन राऊत यांनी स्वत: भूमिका मांडली आहे. आपण नाराज नसल्याचं नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं. “एच के पाटील यांच्या सदिच्छा भेटीसाठी गेलो होतो. त्यानंतर आपल्या नियोजित बैठकींसाठी मंत्रालयात आलो. त्यामुळे नाराज असल्याच्या बातम्या खोळसाळपणाच्या आहेत”, अशी प्रतिक्रिया देत नितीन राऊत यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पक्षाची आज मुंबईच्या वांद्रे येथील एमसीएत महत्त्वाची बैठक पार पडली. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे ठराविक आणि मोजकेच नेते उपस्थित होते. बैठकीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सहित अनेक नेते उपस्थित आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन राऊत यांना या बैठकीच्या संदर्भात कळवण्यात आले नव्हते आणि त्यामुळे त्यांनी एमसीएच्या दरवाजा समोरुन माघारी परतण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस प्रवक्त्यांची प्रतिक्रिया दरम्यान, नितीन राऊत यांच्या नाराजीच्या चर्चांवर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया दिली. “नितीन राऊतांचा गैरसमज झाला असेल, त्यांच्याशी बोलणं झालंय. नितीन राऊतांच्या नाराजीचं काहीच कारण नाही. ही बैठक काँग्रेसच्या ठरावीक नेत्यांपुरतीच होती”, असं अतुल लोंढे यांनी सांगितलं. ( 20 दिवसांपासून ICU मध्ये आहेत लता मंगेशकर, कुटुंबाने दिली नवी माहिती ) महाराष्ट्रातील काँग्रेसबाबतचा संपूर्ण आढावा एच के पाटील घेतील. निधी बाबतची मागणी ज्येष्ठ नेत्यांसमोर ठेवली जाते. नितीन राऊतांच्या निधीबाबत असणाऱ्या प्रश्नांबाबत ही बैठक नव्हती. झालेल्या निवडणुका आणि येणाऱ्या निवडणुका याबाबत या बैठकीत चर्चा झाली, असं अतुल लोंढे यांनी सांगितलं. तसेच काँग्रेसचं निवडणुकीबाबतचं धोरण स्पष्ट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही काँग्रेस म्हणूनच लढणार आणि पक्ष एक नंबरला आणणार, असंही लोंढे यावेळी म्हणाले. नाना पटोले यांची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नितीन राऊत यांच्या नाराज असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया. मंत्री नितीन राऊत नाराजी असण्यासाठी काहीच कारण नाही. आजची बैठक ही आगामी निवडणुका आणि गेल्या निवडणुकीचा निकाल या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. राऊत यांचं बैठकीला येणं अपेक्षित नव्हतं. ते दुसऱ्या कारणासाठी तिथे आले होते. ते एच के पाटील यांना भेटण्यासाठी आले होते, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. “नितीन राऊत नाराज असण्याचं कारण नाही. ते माझ्याशी बोलले. नितीन राऊतांच्या पत्राबाबत आम्ही गंभीर आहोत. ऊर्जा खात्याचा विषय सरकार, सर्वांशी निगडीत आहे”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.