प्रशांत बाग, नाशिक 16 सप्टेंबर : राष्ट्रवादीला लागलेली गळती रोखण्यासाठी आता खुद्द शरद पवारच मैदानात उतरलेत. राज्यभर फिरून कार्यकर्ते आणि नेत्यांशी ते संवाद साधत आहेत. याच मोहिमेवर पवार आज नाशिकमध्ये होते. नाशिक हा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला. पवारांच्या प्रत्येक दौऱ्यात भुजबळ हे कायम त्यांच्यासोबत सावलीसारखे असायचे. मात्र आज भुजबळ दिसत नसल्याने त्यांच्या दौऱ्यात कायम तोच विषय चर्चेचा ठरला होता. भुजबळ हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा जोरात आहेत. त्यातच पवार नाशिकमध्ये येणार असल्याने ते दौऱ्यात असणं अपेक्षीतच होतं. त्यामुळे पवारांनाही भुजबळ का नाहीत असा प्रश्न विचारण्यात येत होता. शेवटी पवारांनीच त्यांचा खुलासा केला पण चर्चा व्हायची ती काही थांबली नाही.
पवार म्हणाले, माझ्या दौऱ्याची आखणी ही भुजबळांनीच केली होती. मात्र जागावाटपाची काँग्रेससोबत बोलणी सुरू असल्याने त्याची बैठक मुंबईत आहे. त्या बैठकीसाठी छगन भुजबळ मुंबईत थांबले आहेत. भुजबळांशी त्याबाबत चर्चा झाल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं. अजित पवार, जयंत पाटील आणि भुजबळ हे काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा करत असल्याचंही पवारांनी सांगितलं. भुजबळ नाशिकमध्ये का नाहीत याचा ते वारंवार खुलासा करत सर्व काही अलबेल आहे असं सांगत होते. राजू शेट्टींचा गनिमी कावा: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर फेकल्या कडकनाथ कोंबड्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची संवाद यात्रा जेव्हा नाशिकमध्ये आली होती तेव्हाही छगन भुजबळांनी त्याला दांडी मारली. त्यामुळे भुजबळांच्या मनात नेमकं काय आहे याचा कुणालाच थागपत्ता लागत नव्हता. या सगळ्या राजकीय चर्चेवर भुजबळांनी खुलासा करत मी राष्ट्रवादीतच आहे असंही स्पष्ट केलं होतं. त्यानंतरही वारंवार भुजबळ शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होते. खासदार सुप्रिया सुळे यांनीही भुजबळ शिवसेनेत जाणार या चर्चेत तथ्य नसल्याचं काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. त्या म्हणाल्या, छगन भुजबळ यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चेवर माझा विश्वास नाही. पक्षात पडझड सुरू आहे हे मान्य आहे. संघर्ष करून अडचणीच्या काळावर मात करणार आहोत. या पक्षातून त्या पक्षात जाणं हे काही सिरीयस राजकारण नाही. राष्ट्रवादीत असलेले, आलेले सगळे फक्त सत्तेसाठी नाहीत.