JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'जलद गतीने पावलं टाका', युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी पवारांचा सरकारला सल्ला

'जलद गतीने पावलं टाका', युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी पवारांचा सरकारला सल्ला

शरद पवार यांनी ट्विट करत युक्रेनच्या खार्कीव्ह शहरात रशियाच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या 21 वर्षीय नवीन शेखरप्पा याच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

जाहिरात

Sharad Pawar

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 मार्च : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरु केलं आहे. या ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांना देशात परत आणण्यात सरकारला यश आलं आहे. पण युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या त्यामानाने अद्यापही कमीच आहे. युक्रेनमध्ये अजूनही हजारो विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. दरम्यान, युक्रेनमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्यात भारताच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतीयांकडून संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील या घटनेवर संवेदना व्यक्त करत केंद्र सरकारला मोलाचा सल्ला दिला आहे. शरद पवार नेमकं काय म्हणाले? शरद पवार यांनी ट्विट करत युक्रेनच्या खार्कीव्ह शहरात रशियाच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या 21 वर्षीय नवीन शेखरप्पा याच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. “युक्रेनच्या पूर्वेकडील खार्किव्ह शहरात गोळीबाराच्या हल्ल्यात आपला जीव गमावलेला आमचा भारतीय विद्यार्थी नवीन शेखरप्पा याच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना. आमचे हजारो विद्यार्थी अजूनही युक्रेनमध्ये कठोर हवामानात आणि अन्नाशिवाय अडकले आहेत. मी केंद्र सरकार आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांना विनंती करतो की त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य, ​​या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची निराशा आणि चिंता समजून घ्या. अडकलेल्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने जलद गतीने पावलं टाकले पाहिजे”, असं शरद पवार ट्विटरवर म्हणाले आहेत.

रशियन सैन्याकडून सुरु असलेल्या या हल्ल्यात नवीन शेखरप्पाचा मृत्यू झाला आहे. तो मुळचा कर्नाटकचा होता. नवीनच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नवीनने दोन दिवसांपूर्वीच आपल्या वडिलांशी व्हिडीओ कॉलवर बातचित केली होती. त्यांच्या व्हिडीओ कॉलचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ( महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा धुराळा होण्याची शक्यता, विरोधक ‘या’ मुद्द्यांवरुन सरकारला घेरणार? ) नवीन हा युक्रेनच्या खार्कीव्ह या शहरात वास्तव्यास होता. तिथे तो शिक्षणाच्या निमित्ताने गेला होता. खार्किव्ह हे युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. शहरात सध्या तणावपूर्वक वातावरण आहे. खार्किव्ह शहरात आज सकाळी झालेल्या हवाई हल्ल्यात नवीनचा मृत्यू झाला. नवीन अवघ्या 21 वर्षांचा होता. तो खार्किव्ह नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या मृत्यूमुळे भारताला मोठा झटका बसला असून देशासाठी ही चिंतेची बाब आहे. या घटनेमुळे भारतातही खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या