नाशिक, 09 ऑगस्ट : उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात नाशिकचे दादाजी भुसे हे कृषीमंत्री होते. (Nashik Dadaji Bhuse) दादाजी भुसे यांनी आपल्या कामाचा धडाका जोरदार ठेवल्याने ते नेहमी चर्चेत असायचे कृषी विभागाच्या कारभारावर त्यांची करडी नजर असल्याने त्यांनी आपल्या विभागाचा कारभार चांगला हाकल्याची जोरदार चर्चा होती. परंतु एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने भुसेंनी आपली मैत्री कायम ठेवत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचे ठरवले आणि शिंदेच्या मैत्रीचे गिफ्ट त्यांना मिळाले आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात ते पुन्हा कॅबीनेटमंत्री पदी विराजमान होणार आहेत.
हे ही वाचा : ‘संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद देणे हे अत्यंत दुर्दैवी’, चित्रा वाघ संतापल्या, भाजपला घरचा अहेर
मागच्या 25 वर्षांपासून दादाजी दगडू भुसे जाणता राजा मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. ते आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक असल्याचेही बोलले जात होते. त्यांनी आनंद दिघेंच्या कार्यातून प्रेरणा घेत शिवसेनेचे कार्य केले आहे. 2004 साली पहिल्यांदा आमदार होत आपल्या राजकीय कारकीर्दीला त्यांनी सुरूवात केली आहे. 2004 साली मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून विजयी झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
हे ही वाचा : ‘स्वच्छ’ प्रतिमेचं काय? अब्दुल सत्तारांपासून संजय राठोडांपर्यंत वादात अडकलेल्या या आमदारांनीही घेतली शपथ, केसेस मागे?
2004, 2009, 2014 व 2019 सलग चार पंचवार्षिक मालेगाव बाह्य मतदारसंघात त्यांनी विजय मिळवल्याने त्यांनी आपल्या मतदारसंघावर चांगलीच पकड निर्माण केली आहे. 2014 ला सेना भाजप युती सरकारमध्ये ग्रामविकास राज्यमंत्री, सहकार राज्यमंत्रीपदावर ते विराजमान होते. 2019 ला महाविकास आघाडी सरकारमध्ये अडीच वर्षे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्रीपद त्या भुषविले आहे.
मागच्या दिड महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्याने दादाजी भुसे हे शिंदे गटात सामील झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दादा भुसे यांची मागच्या 20 वर्षांपासून मैत्री असल्याने ते त्यांच्यासोबत गेल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या राज्यातील दौऱ्याची सुरुवातही मालेगावातून झाल्याने त्यांच्यातील मैत्रीचे संबंध किती दृढ आहेत याबाबत दिसून येते.