नाशिक 2 डिसेंबर : नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी या आदिवासी पाड्यावरील जिल्हा परिषद शाळा सध्या देशभरात चर्चेत आली आहे.त्याच कारण ही तसच आहे. ही शाळा वर्षभर म्हणजे 365 दिवस, आणि रोज 12 तास सुरू असते. तुम्हाला हे वाचून धक्का बसला असेल. कसं शक्य आहे! असा प्रश्न पडला असेल, पण हे खरं आहे. हे विद्यार्थी रोज फक्त शाळेत जात नाहीत तर तिथं अभ्यासही करतात. त्यांना तब्बल हजारपर्यंतचे पाढे पाठ आहेत. काय आहे रहस्य? आदिवासी बहुल भागातील अनेक मुल ही शिक्षणापासून वंचित आहेत.त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केशव गावित हे शिक्षक सतत झटत आहेत. मुलांना दररोज पुस्तकी ज्ञान दिल्यानंतर त्यांना ते नकोसे वाटते. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे देता येईल याचा विचार केशव गावित करत असतात. साठपेक्षा जास्त विद्यार्थी या शाळेत आहेत. त्यापैकी एकालाही शाळा बुडवावी वाटत नाही. रोज हे सर्वजण शाळेत येतात. रविवार, सण, उत्सव, असं कोणतंही कारण देऊन मुलं घरी थांबत नाहीत. शाळा हेच या मुलांचं घर बनलं आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना ऑलिम्पिकसाठी तयार करणारा आधुनिक द्रोणाचार्य, Video शाळेत मिळतात शेतीचे धडे भारत हा कृषिप्रधान देश आहे. पण, सध्या अनेक तरूणांना शेती करावी वाटत नाही. हा प्रश्न ओळखून त्यावर उपाय शोधण्याचं काम या शाळेनं केलं आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना थेट बांधावर नेऊन शेतीचे धडे दिले जातात. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तीनही ऋतूमध्ये होणारी हंगामी शेती, आधुनिक फळबाग, फुलबाग यांचंही त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. IAS, IPS घडवण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांमध्ये अनेक कलागुण आहेत. वर्षभर शाळा सुरू असली तरी ते थकत नाहीत. त्यांच्यात नेहमीच उत्साह असतो. त्यांच्यातील अभ्यास करण्याची क्षमताही वाढली आहे. प्रत्येक गोष्ट शिकवल्यानंतर ते तात्काळ आत्मसात करतात. या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करुन त्यामध्ये यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं गावित यांनी स्पष्ट केलं. गवंड्याची मुलगी बनली सरकारी अधिकारी, पाहा प्रेरणा देणारा Video सरकारी पातळीवर दखल ‘नाशिक जिल्ह्यातील आदर्श शाळा म्हणून हिवाळी शाळेचे नाव आहे. केशव गावित यांनी अतिशय मेहनत घेऊन ही शाळा घडवली आहे. या शाळेची प्रेरणा घेऊन इतर शाळांमध्ये देखील कसा बद्दल करता येईल त्याचा आम्ही विचार करत आहोत. 365 दिवस ही शाळा सुरू असते. हे बंधनकारक नाही. मुलं स्वत:हून अगदी आनंदानं शाळेत येतात. त्यांना शिक्षणाची गोडी लागली आहे,’ अशी कौतुकाची थाप जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे.