मुंबई, 11 ऑक्टोबर : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये नाना पाटेकर यांनी शिंदे आणि फडणवीस यांना काही तिखट प्रश्नही विचारले. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या कार्यक्रमात हे तिघं एकाच व्यासपीठावर आले होते. यातल्या एका प्रश्नावर नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. नुसती मान हलवू नका बोला, असं नाना पाटेकर मुख्यमंत्र्यांना म्हणाले. ‘तुम्ही जेव्हा चुकीचं बोलता, तेव्हा आम्हाला नाही का वाईट वाटतं, आम्हाला नाही का त्रास होत? आम्ही कुणाच्या हातामध्ये सत्ता दिली आहे. तुम्ही लोकसेवक आहात, राज्यकर्ते नाही. आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे, कारण आमच्यात तेवढी पात्रता नाही’, असं नाना पाटेकर म्हणाले. नाना पाटेकर हे बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी मान हलवली. तेव्हा एकनाथराव तुम्ही नुसती मान हलवताय, बोला, असं वक्तव्य नाना पाटेकर यांनी केलं.
‘अडीच वर्ष तुम्हाला हे जाणवलं असेल, 3 महिने आम्ही राज्यकर्ते नाही, शासनप्रमुख नाही. आम्ही या राज्यातल्या जनतेचे सेवक म्हणून काम करणार आहोत,’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नेत्यांकडून वापरण्यात येणाऱ्या भाषेवरही नाना पाटेकर यांनी आक्षेप घेतला. नेते सर्रासपण असंसदीय शब्दांचा वापर करत असल्याची खंत नाना पाटेकर यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. 2019ची चूक सुधारायला इतका वेळ का लागला? नाना पाटेकरांनी मुख्यमंत्र्याच्या मर्मावर ठेवलं बोट