तुषार रुपनवर (मुंबई), 28 डिसेंबर : राज्यात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांवरील झालेल्या घोटाळ्याच्या वरून जोरदार गदारोळ सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. अब्दुल सत्तार, उदय सामंत आणि संजय राठोड यांच्यावर महाविकास आघाडीने जोरदार आवाज उठवत त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. दरम्यान या झालेल्या आरोपांमध्ये अब्दुल सत्तार यांचे मंत्रीपद धोक्यात असल्याचे बोलले जात आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तारांची बाजू घेत त्यांची पाठराखण केली आहे.
टीईटीचा घोटाळा कुणाच्या काळात झाला? तेव्हा सरकार काय करत होतं? राज्यातल्या लाखो तरुणांना बुडवणारा घोटाळा यांच्या सत्ताकाळात झाला. सनदी अधिकाऱ्यांपासून सगळे लोक टीईटीच्या घोटाळ्यात लिप्त होते. यांच्या काळात झालेल्या टीईटी घोटाळ्याचे तार मंत्रालयात गेले. तिथले अधिकारी त्यात अटक झाले. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा : शरम असती तर त्यांनी …, आदित्य ठाकरेंचा पुन्हा शिंदे गटावर हल्लाबोल; मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी
ते पुढे म्हणाले की, अब्दुल सत्तारांवर जो आरोप लावला जातोय, त्यांच्या कुठल्याही मुलीला टीईटीच्या अंतर्गत नोकरी लागलेली नाही. याउलट प्रशासनाने खुलासा करून त्याच वेळी त्यांना अपात्र ठरवल्याचा खुलासाही केला आहे. पण एक नवीन पद्धत सुरू झाली आहे. कोणत्याही मंत्र्यावर बेछूट आरोप करायचे आणि निघून जायचं. त्याला तसंच उत्तर आम्ही देऊ. आम्ही सोडणार नसल्याचे फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा : मुंबई कोणाच्या बापाची नाही दावा कराल तर…; फडणवीसांची कर्नाटक सरकारला तंबी
मला आश्चर्य वाटतं की हा पहिला विरोधी पक्ष असेल, की जो स्वत:च्या सत्ताकाळातल्याच गोष्टी घोटाळे म्हणून बाहेर काढतोय. असा विरोधी पक्षच पाहिला नाही. त्यांनी बॉम्ब म्हटलं आणि लवंगी फटाकेही सापडत नाहीयेत. त्यासंदर्भात वरून आदेश असतील. त्यांनी पहिल्यांदा उत्तर दिलं पाहिजे की टीईटीचा घोटाळा का झाला? अपात्र कंपन्यांना पात्र कुणी केलं? त्यांच्यावतीने परीक्षा कुणी घेतली? सत्तारांच्या मुलींना नोकरी मिळालेली नाही.