सोलापूर, 11 एप्रिल: राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. एकीकडे तबलिगींमुळे मुस्लिम समाजावर टीकेची झोड उठत असतानाच सोलापुरात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळालं आहे. सोलापुरात एका हिंदू व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या अंत्ययात्रेसाठी चक्क मुस्लिम युवकांनी पुढाकार घेतला. एवढेच नाही तर हिंदू धर्म-परंपरेने अंत्यविधीही पार पाडला. हेही वाचा… लष्करात असलेल्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी आई-वडिलांचा 2 हजार किमी प्रवास सोलापुरातील गोदुताई विडी घरकुल परिसरात उत्तरप्रदेश येथील भोलाशंकर नामक कामगाराचे हृदयविकाराने निधन झाले होते. मूळ आग्रा येथील असलेले भोलाशंकर हे रोजीरोटीसाठी सोलापूरला आले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे ते सोलापुरात अडकून पडले होते. बुधवारी भोलाशंकर यांचा अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. भोलाशंकर यांचे कोणतेच नातेवाईक सोलापुरात राहायला नव्हते. परिसरात राहणाऱ्या लोकांनी नातेवाईकांशी संपर्क केला. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांचं सोलापुरात पोहोचणे जवळपास अशक्य होते. त्यामुळे अखेरीस परिसरातीलच मुस्लिम तरुणांनी पुढाकार घेत त्यांच्या भोलाशंकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. हेही वाचा… धारावीत COVID-19 चा चौथा मृत्यूच; मुंबईच्या कोरोना हॉटस्पॉटमधली चिंता वाढली अफजल पठाण, तौफिक तांबोळी, महिबूब मनियार, वसीम तांबोळी, वसीम देशमुख, मल्लिनाथ पाटील या तरुणांनी या कामात पुढाकार घेतला. याच तरुणांनी त्यांच्यासाठी तिरडी बांधण्यास सुरुवात केली. कुंभारी परिसरातील एका पुरोहिताला बोलावून हिंदू परंपरेनुसार अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण करण्यात आली. याच लोकांनी भोलाशंकर वर्मा यांना खांदा देऊन त्यांचे अंत्यसंस्कारही केले. भोलाशंकर वर्मा यांचा संपूर्ण अंत्याविधी त्यांच्या नातेवाईकांना व्हिडीओ कॉलद्वारे दाखवण्यात आला. संपादन- संदीप पारोळेकर