मुंबई, 18 नोव्हेंबर : मुंबई शहरालगत असणारे मुख्य शहर म्हणून ठाणे शहराची ओळख आहे. दरम्यान ठाणे आणि मुंबई शहराला जोडणाऱ्या वाहतुकीच्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात गर्दीचा आपल्याला सामना करावा लागतो. दरम्यान या वाहतुक कोंडीच्या त्रास आणखी वाढणार आहे. ठाणे आणि मुंबई शहराला जोडणारी तसेच राज्य महामार्गाला संलग्न असलेल्या मुख्य वाहिनीचा अत्यंत महत्त्वाचा कोपरी पूल येत्या शनिवार-रविवारी वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
कोपरी पुलावर 63 मीटर लांबीचे 110 टनाचे सात गर्डर टाकण्यासाठी रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. या कालावधीत या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर कंटेनरसह अवजड वाहतूक होत असते. अन्य वाहनांसह अवजड वाहनांनाही पर्यायी मार्गाची व्यवस्था वाहतूक विभागाने केली असली तरी या दोन दिवसांच्या कालावधीत खारेगाव टोलनाका, कळवा-विटावा, मॉडेला चेकनाका आदी ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : मुंबईतील 100 वर्ष जुनं इराणी हॉटेल होणार बंद, राजेश खन्नांसह अनेकांचा होता अड्डा
या मार्गावर मुंबई आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कोपरी पुलावरून दररोज ठाणे, भिवंडी, नाशिक, घोडबंदर येथून हजारो वाहने मुंबई तसेच ऐरोलीच्या दिशेने वाहतूक करत असतात. कोपरी पुलावरून ठाण्याकडे आणि ठाण्याकडून मुंबईकडे, नवी मुंबईकडे जाणाऱ्या जड आणि अवजड हजारो वाहनांची संख्या आहे. दरम्यान हा पूल गर्डर बसवण्यासाठी दोन वेळा हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
आता गर्डर टाकण्यासाठी 19 आणि 20 नोव्हेंबर हे दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी रात्री 11 ते सकाळी 6 या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक खोळंबा होऊ नये यासाठी वाहतूक विभागाने पर्यायी मार्ग दिले आहेत, मॉडेल तीन हात नाका, जड वाहनांमुळे खारेगाव टोलनाका, नवघर पूर्व-पश्चिम पूल, एसीसी सिमेंटमार्ग हे अरुंद रस्ते असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : देवानंदपासून नाना पाटेकरपर्यंत कलाकारांची पुण्यातील ‘या’ कॅफेला आहे पहिली पसंती
रस्ते वाहतुकीबरोबर लोकल कोंडीचाही फटका बसणार
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशीद बंदर रेल्वे स्थानकांदरम्यानचा 154 वर्षे जुना कर्नाक उड्डाणपूल पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तब्बल 27 तासांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे शनिवारी (दि 19), रविवारी (दि 20) उपनगरीय सेवा मुख्य मार्गावर भायखळ्यापर्यंत, तर हार्बर मार्गावर वडाळ्यापर्यंतच सुरू राहणार असून या मार्गावरील लांब पल्ल्याच्या तब्बल 36 गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉकमुळे होणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीची आणि वेळातील बदलांची प्रवाशांनी कृपया नोंद घेत या दिवशी प्रवास करावा असे आवाहन, रेल्वे प्रशासनाने केले आहे.