मुंबई, 06 ऑगस्ट : हेरॉईन तस्करीप्रकरणी अंगोलाच्या एका नागरिकाला मुंबईत अटक करण्यात आली. अटक केलेला अंगोलन नागरिक पोटात लपवून हेरॉइनची तस्करी करत होता. त्याच्याकडून सीमाशुल्क विभागाने दीड किलो हेरॉईन जप्त केले आहे. जप्त केलेल्या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारानुसार किंमत 10.45 कोटी एवढी आहे. गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर या व्यक्तीला अटक करण्यात आली. अंगोलातील इतर काही नागरिकांना या महिन्यातच तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. एका महिन्यात अंगोलाच्या नागरिकाला अंमली पदार्थांच्या तस्करीत अटक होण्याची ही तिसरी वेळ आहे. या प्रकरणामध्ये, सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिटने 31 जुलै रोजी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आदिस अबाबाहून इथियोपियन एअरलाइन्सने आलेल्या नेलो नादाबोला तस्करीसाठी अटक केली आहे. 25 तास टॉयलेटला गेला नाही - टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरोपीने औषधाच्या कॅप्सूल पोटात लपवून ठेवल्या होत्या. 20 ते 25 तास आरोपी शौचासही गेला नव्हता. त्यामुळे त्याच्या पोटात सूज आली होती. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “प्राथमिक चौकशीदरम्यान, आरोपीने स्वेच्छेने आम्हाला सांगितले की, त्याने त्याच्या पोटात ड्रग्स कॅप्सूल लपवले होते. कॅप्सूलमुळे त्याचे पोट सुजले होते. सुमारे 20-25 तासांपासून तो टॉयलेटला गेला नव्हता. पोटात प्रचंड दुखत असल्याने त्याला अस्वस्थ वाटत होते. हे वाचा - पर्यावरण मंत्रालयाकडून अस्लम शेख यांना नोटीस;BJP प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम? ‘पोटातून 127 कॅप्सूल काढले - नेलो एनदाबो याला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले. रुग्णालयात त्याच्या पोटातून 127 कॅप्सूल काढण्यात आल्या. काढलेल्या कॅप्सूलमधील पांढरी पावडर हेरॉईन असल्याचे सांगण्यात येत आहे. नेलो याला माहीत होते की, पोटात कॅप्सूल ठेवून ड्रग्जची तस्करी करणे धोकादायक आहे आणि त्यामुळे त्याचा जीवही जाऊ शकतो, असे अधिकारी म्हणाले. मात्र आर्थिक कारणास्तव आपण असे केल्याचे त्यांने सांगितले. नेलोच्या म्हणण्यानुसार, त्याची आर्थिक स्थिती चांगली नाही, त्यामुळे त्याला हे काम करावे लागले.