राज ठाकरेंची मोठी घोषणा
मुबई, 21 ऑक्टोबर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादरला शिवाजी पार्क येथे दिपोत्सव आयोजित केला होता. या दीपोत्सव सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी उपस्थिती लावली होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या दिपोत्सवाला हजेरी लावल्यानंतर एका नव्या राजकीय समीकरणाबद्दल चर्चा होत होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भाजप आणि शिंदेंचा पक्ष हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत होत्या. शिवाजी पार्कवरील दिपोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीने या महायुतीची रंगीत तालीम पाहायला मिळाली होती. कारण पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एका मंचावर आले होते. यादरम्यान, मनसेचे आमदार राजू पाटील यांनीसुद्धा यावर भाष्य केले होते. युती करायची की नाही हे राज साहेब ठरवतील. त्यांनी निवडणुका स्वबळावर लढावे, असे आदेश दिले आहे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे तयारी केली आहे. मात्र, साहेबांनी जर युती करायला सांगितली तर तीसुद्धा करायला आम्ही तयार आहोत. आमची सर्वांची मन जुळलेली आहेत, फक्त वरुन तारा जुळल्या की सर्व जुळून येईल, असे महत्त्वाचे विधान आमदार राजू पाटील यांनी केले होते. मनसे आमदार राजू पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महायुतीच्या चर्चांना उधाण आले होते. हेही वाचा - कोल्हापुरात राज ठाकरेंचा एल्गार; सीमावादाच्या मुद्द्यावरही विरोधकांना घेरलं मात्र, या सर्व चर्चांना स्वत: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर्णविराम देत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून कोकण दौऱ्यावर आहेत. याआधी आज त्यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबई महापालिका स्वतंत्र लढणार, असे सांगितले. राज ठाकरेंनी केलेल्या घोषणनेंतर मनसेच्या दिपोत्सवात राज्यातील तिन्ही दिग्गज एकत्र आल्यानंतर सुरू झालेल्या महायुतीच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.