मुंबई, 8 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याची मुदत काल (सोमवारी)संपली. त्यामुळे कोणत्या मतदारसंघात कशी लढत होणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे. आघाडीला चितपट करून भाजप-शिवसेना पुन्हा सत्ता काबीज करणार की काँग्रेस आणि राष्ट्रवादी युतीला धक्का देत मैदान मारणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. सत्ताधाऱ्यांनी नेत्यांची मेगाभरती करून घेतल्यानंतर आधीच घायाळ झालेल्या राष्ट्रवादीचा तिकीट वाटपातही गोंधळ झाला आहे. अनेक मतदारसंघात कोणत्याच उमेदवाराला एबी फॉर्म न दिल्याने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली आहे. तर काही मतदारसंघात तर घड्याळाला मत न देता दुसऱ्याच उमेदवाराचं समर्थन करा, असं सांगण्याची वेळ राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर आली आहे. 1. चिंचवड चिंचवड विधानसभा मतदान संघात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. कारण चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. पक्षाचा अधिकृत AB फार्म नसल्याने आघाडीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला. एकीकाळी बालेकिल्ला असणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये उमेदवार ठरवताना राष्ट्रवादीला तारेवरची कसरत करावी लागली. अनेक दिवसांच्या घोळानंतर चिंचवड मतदारसंघातून राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणी प्रशांत शितोळे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यांच्या अर्जासोबत पक्षाचा AB फॉर्म नसल्याने हा अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळे या मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला आहे. 2. भोसरी भोसरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी पक्षाच्या तिकीटावर न लढता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या एका स्थानिक नगरसेवकानेही या मतदारसंघातून अपक्ष लढण्याचाच निर्णय घेतला. मात्र अखेरच्या क्षणी या नगरसेवकाला माघार घेण्यास सांगून राष्ट्रवादीने आता विलास लांडे यांना पुरस्कृत केलं आहे. 3. करमाळा करमाळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने संजय पाटील यांना अधिकृत उमेदवारी दिली. मात्र, त्यांना मतदान करू नका. तर अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना मतदान करा, असे खुद्द राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. उमेदवारी अर्ज भरताना आणि तो मागे घेण्यापर्यंत राष्ट्रवादीमध्ये ताळमेळ नसल्याने आता राष्ट्रवादी नेतृत्वावरच राष्ट्रवादीला मतदान करू नका, असे सांगण्याची वेळ आली आहे. 4. सांगोला सांगोला मतदारसंघातही राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शेकापला सोडली. त्यामुळे नाराज झालेले राष्ट्रवादीचे नेते दीपक साळुंखे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यामुळे इथेही राष्ट्रवादीऐवजी शेकापला मतदान करा, असे सांगण्याची वेळ राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आली आहे. 5. पंढरपूर पंढरपूरच्या जागेवरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधील वाद आता शिगेला पोहोचला आहे. कॉंग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीने उमेदवार दिल्याने चिडून कॉंग्रेस नेत्यांनीही पंढरपूरमध्ये कॉंग्रेस उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. येथील जागेरून निवडणूक प्रचारापूर्वीच दोन्ही कॉंग्रेसमध्ये घमासान सुरू झाले आहे. महायुतीने राजकारणातील मुरब्बी सुधाकर परिचारकांना उमेदवारी देत विरोधी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. परिचारकांच्या विरोधात कॉंग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेल्या आमदार भारत भालकेंना उमेदवारी दिली आहे. युतीला मेगाभरती पडली भारी, बंडोबांनी दंड थोपडले दारोदारी, पाहा हा VIDEO