रायचंद शिंदे,(प्रतिनिधी) जुन्नर,19 ऑक्टोबर: जमिनीवरून आकाशात उडणारं एखादं हेलिकॅप्टर पाहिलं की प्रत्येकाला वाटतं की आपणही हेलिकॅप्टरमधून भरारी घ्यावी. परंतु हे स्वप्न सर्वांनाच पूर्ण करता येतंच, असं नाही. परंतु ही किमया साध्य केली आहे ती शिवजन्मभूमीतल्या एका शेतकरी कुटुंबातल्या व नव्यानेच खासदार झालेल्या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक डॉ.अमोल कोल्हे यांनी… राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रचार कार्यासाठी डॉ.अमोल कोल्हे यांना एक हेलिकॉप्टर दिलं होतं. डॉ.अमोल कोल्हे यांच्या होमपीच असलेल्या जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक इथे शेवटची सभा शनिवारी झाली. मागील 15 दिवसांत तब्बल 53 सभा घेतलेल्या डॉ.अमोल कोल्हे यांनी शेवटची सभा घेतली. ती आपल्या बालपणीच्या मित्रांसाठी म्हणजेच राष्टवादी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या अतुल बेनके यांच्यासाठी. खासदार झाल्यानंतर प्रथमच डॉ.अमोल कोल्हे थेट हेलिकॅप्टरने सभास्थळी दाखल झाले. लाल-पिवळ्या एसटीतून फिरणारा अमोल आता हेलिकॉप्टरमध्ये फिरत आहे हे केवळ साध्य झालं ते शरद पवार साहेबांमुळे व जुन्नरच्या जनतेमुळे त्याबद्दल डॉ. कोल्हे यांनी भरसभेत जुन्नरच्या जनतेचे आभार मानले. जुन्नर विधानसभा मतदारसंघात शिरोली बुद्रुक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अतुल बेनके यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.अमोल कोल्हे यांनी मतदारांशी संवाद साधताना लहानपणी लाल-पिवळ्या एसटीतून फिरणारा अमोल कोल्हे आता केवळ आपल्यामुळेच हेलिकॉप्टरमधून फिरत आहे आणि हे सर्व शरदचंद्रजी पवार साहेब व आपल्याच पाठिंब्यामुळे झाले आहे. त्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले. जेवणाची थाळी भीक म्हणून देण्यापेक्षा हक्काचा रोजगार द्या… डॉ.अमोल कोल्हे यांनी यावेळी बोलताना शिवसेनेवर घणाघाती टीका केली. दहा रुपयांची जेवणाची थाळी भीक म्हणून देण्यापेक्षा आमच्या हक्काचा रोजगार द्या. आम्ही शंभर रुपयांची थाळी आमच्या मेहनतीवर कमवू, असा टोलाही डॉ.कोल्हे यांनी लगावला. ज्या शिवसेनेला अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी एक वीट रचता आली नाही त्यांना शिवजन्मभूमीत मत मागण्याचा अधिकार नाही, असेही ते म्हणाले. ज्या सरकारने पाठ्यपुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हद्दपार केला, त्या सरकारला ही जनता आता हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य ही त्यांनी या सभेत केले . VIDEO:परळीपासून ते वरळी ‘या’ आहे राज्यातील बिग फाईट्स, कोण मारणार बाजी?