मुंबई, 21 डिसेंबर : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे वातावरण तापलेले असताना हवामान विभागाने मात्र वातावरणात गारवा येण्याची शक्यता असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यात हवेत अचानक बदल झाला आहे. मुंबईत तापमान घसरल्याने काही प्रमाणात थंडी पसरल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह पुण्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मागच्या काही दिवसांपासून मुंबईत रात्रीचे तापमान सुमारे 25 अंश सेल्सिअस नोंदवले जात होते. दरम्यान आठवडाभरात मंगळवारी मुंबईचे किमान तापमान 20 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या सांताक्रूझ वेधशाळेत नोंदवलेले किमान तापमान 20.5 अंश सेल्सिअस होते, तर कुलाबा वेधशाळेत 23.2 अंश सेल्सिअस होते. ख्रिसमस वीकेंडमध्ये तापमान आणखी घसरण्याची शक्यता असल्याचे IMD अधिकारी आणि हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे.
हे ही वाचा : पुणे, औरंगाबादमध्ये थंडी वाढली, पाहा किती आहे तुमच्या शहराचं तापमान?
राज्यातून सध्यातरी पाऊस गायब, थंडीचा जोर वाढला
मागच्या काही दिवसांपासून पावसाची स्थिती असल्याने थंडी गायब झाली होती. दरम्यान सध्या वातावरण कोरडे असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. तर मंगळवारी (ता. 20) किमान तापमानात मोठी घट झाल्याने गारठा वाढला आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील नीचांकी 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. 21) राज्याच्या तापमानात चढ- उतार होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या किमान तापमानात अचानक घट होऊन धुळे येथे 10 अंश, निफाड येथे 10.2, औरंगाबाद येथे 10.4 अंश तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा 10 ते 20 अंशांच्या दरम्यान होता. तर रत्नागिरीत राज्यातील उच्चांकी 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यातही बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 30 अंशांच्या पार आहे.
हे ही वाचा : रंकाळ्यातील पक्षी निरिक्षणात आढळले 7 विदेशी पाहुणे, पाहा काय आहे खास Video
पूर्व-मध्य अरबी समुद्रातील कमी दाब प्रणाली निवळून गेली आहे. तर दक्षिण-मध्य बंगालच्या उपसागरात विषुववृत्ताजवळ असलेले कमी दाब क्षेत्र हळूहळू वायव्येकडे सरकत आहे. उद्यापर्यंत (ता. 22) ही प्रणाली श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे.