कोल्हापूर, 01 नोव्हेंबर : कोल्हापूर आणि
कोल्हापूर
च्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. एक संपूर्ण शक्तीपीठ असल्यामुळे या मंदिराला अनन्य साधारण महत्त्व आहे. परंतु या मंदिराच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी अनेकांना माहीत नाहीयेत. यापैकीच एक म्हणजे ‘मातृलिंग’ मंदिर होय. खरंतर अंबाबाई मंदिराच्या स्थापत्य आणि रचनेत अनेक वैशिष्ट्ये आढळतात. याच अनेक वैशिष्ट्यांपैकी महत्त्वाचे म्हणजे मातृलिंग मंदिर आहे. अंबाबाईच्या वरच्या मजल्यावर मातृलिंग मंदिर अंबाबाई मंदिराच्या अंतर्गत रचनेत दोन मजले आहेत. बाहेरून हे फक्त एक मजल्याचेच मंदिर वाटते. खाली गाभार्यात करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती आहे. तर बरोबर तिच्या डोक्यावरच म्हणजेच वरच्या मजल्यावर मातृलिंग मंदिर आहे. खाली कासव चौक आणि गर्भगृहात अंबाबाईची मूर्ती अशी रचना आहे. त्याच पद्धतीने वरच्या मजल्यावर नंदी आणि गर्भगृहात महादेवाची पिंड आणि चौथर्यावर गणेशाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. या शिवलिंगालाच मातृलिंग म्हटले जाते. याच मातृलिंग मंदिरावर मुख्य शिखर आहे. हेही वाचा :
कोल्हापूरच्या रस्त्यावर अवतरली ‘बांबूची दुनिया’, घराच्या सजावटीसाठी मिळतीय पसंती, Video संपूर्ण भारतातील एकमेव मंदिर अंबाबाई मंदिरातील देवीच्या वरच्या बाजूला शिवलिंगाचे स्थान आहे. या शिवलिंगाला मातृलिंगेश्वर असे म्हटले जाते. मातृउपासनेची सुध्दा लिंग रुपात प्रतिष्ठापना झालेलं करवीर हे संपूर्ण भारतातील एकमेव मंदिर आहे. या ठिकाणी जरी शिवलिंग असले, तरी तिथे आईचे वात्सव्य, तिचे प्रेम, तिची माया अशा स्वरुपाची भक्ती आहे. त्यामुळे जशी अंबाबाईच्या मुर्तिभोवती पूर्ण प्रदक्षिणा घालता येते, तशीच या मातृलिंगाला देखील पूर्ण प्रदक्षिणा घालायची परंपरा आहे, असं मंदिर रचना आणि मुर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा सांगतात. मातृलिंग मंदिरात जाण्यासाठी चिंचोळ्या गुप्त पद्धतीच्या पायर्या आहेत. अंबाबाईच्या मूर्तीशेजारी ज्या पद्धतीने तीन वेगवेगळ्या खोल्या आहेत. त्याच पद्धतीने वरच्या मजल्यावरसुद्धा छोट्या छोट्या तीन खोल्या आढळतात. त्याला ‘ध्यान गृह’ असेही म्हटले जाते. हेही वाचा :
कोल्हापुरी लड्डू पान लय भारी! काय आहे खासीयत पाहा VIDEO वर्षभरात फक्त 3 वेळा उघडतात दरवाजे सध्या मातृलिंग मंदिरात भक्तांना दररोज दर्शनासाठी प्रवेश दिला जात नाही. वर्षातून फक्त तीनवेळा मंदिर उघडले जाते. श्रावण सोमवारी, वैकुंठ चतुर्थी, महाशिवरात्री या तिन्ही वेळा भक्तांसाठी मातृलिंग मंदिर दर्शनासाठी उघडले जाते. ज्याप्रमाणे करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा करण्याचा मार्ग आहे. त्याचप्रमाणे मातृलिंगासही पूर्ण परिक्रमा करण्याचा प्रदक्षिणा मार्ग आहे. त्यामुळे जेव्हा हे मंदिर उघडले जाते. तेव्हा या वैशिष्ट्यपूर्ण मंदिरात भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात.
मंदिराचा पत्ता अंबाबाई मंदिर जोतिबा रोड, महाद्वार रोड, कोल्हापूर, महाराष्ट्र 416002