JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मेस्सी साहेबांनी वर्ल्ड कप जिंकला, फुटबॉलवेड्या कोल्हापुरात एकच जल्लोष... Video

मेस्सी साहेबांनी वर्ल्ड कप जिंकला, फुटबॉलवेड्या कोल्हापुरात एकच जल्लोष... Video

मेस्सीच्या स्वप्नपूर्तीची दिवाळी फुटबॉलवेड्या कोल्हापूरात साजरी झाली. शनिवारी रात्री संपूर्ण कोल्हापूर शहर फुटबॉल आणि मेस्सीमय झालं होतं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 19 डिसेंबर : अर्जेंटीना विरुद्ध फ्रान्स यांच्यात झालेल्या फुटबॉलवर्ल्ड कप फायनलचा थरार साऱ्या जगानं अनुभवला. शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीनं खेळल्या गेलेल्या या मॅचमध्ये अर्जेंटीनानं पेनल्टी शूट आऊटवर बाजी मारली आणि लिओनेल मेस्सीचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं. मेस्सीच्या स्वप्नपूर्तीची दिवाळी फुटबॉलवेड्या कोल्हापूरात साजरी झाली. शनिवारी रात्री संपूर्ण कोल्हापूर शहर फुटबॉल आणि मेस्सीमय झालं होतं. मेस्सीनं ‘वन लास्ट चान्स’ या वाक्याला खरं केलं.. भावानं वर्ल्ड कप जिंकायचं स्वतःचं आणि आमचं पण स्वप्न पूर्ण केलं.. अशा भावना व्यक्त करत कोल्हापूरातील तरुणांनी जल्लोष केला. या मॅचमधील चुरस ज्याप्रमाणे कतारमधील स्टेडियममध्ये होती, अगदी तसेच वातावरण अख्या कोल्हापूर शहरात पाहायला मिळत होते. चौकाचौकात मोठमोठे स्क्रीन लावून या मॅचचा आनंद लुटण्यात कोल्हापूरकर मग्न झाले होते. तिकडं गोल झाला रे झाला, की लगेच इकडे स्क्रीन समोर जल्लोष सुरु होत होता. चौकांबरोबरच कोल्हापुरातील ग्राउंड्स, टर्फ यांच्यावर देखील मोठ्या संख्येने कोल्हापूरकर मॅच बघण्यासाठी जमले होते. साहेबांनी वर्ल्ड कप जिंकला! मेस्सी या खेळाडूसाठी तर कोल्हापूरकर ठार वेडे आहेत. या खेळाडूला बरेच तरुण साहेब म्हणून संबोधतात. ‘साहेबांनी वर्ल्ड कप जिंकला.’ अशी एकच चर्चा सगळीकडे बघायला मिळत होती. अर्जेंटिनाने मॅच जिंकल्याचा आनंद तर कोल्हापुरी फुटबॉल प्रेमींना अगदी गगनात मावेनासा झाला होता. मेस्सीने  फायनलमध्ये घडवला इतिहास, अशी कामगिरी करणारा एकमेव फुटबॉलपटू सगळीकडे फक्त जर्सी नंबर 10 अर्थात मेस्सीचे टी-शर्ट घातलेले तरुण दिसत होते. कोल्हापुरातील सर्व चौक रात्री 12 नंतरही गर्दीने फुलून गेले होते. कुणी फटाक्यांची आतषबाजी करत होते. तर कुणी मेस्सीच्या नावाने घोषणा देत होते. कोल्हापूरकर तरुणांनी पुन्हा एकदा दिवाळीचे वातावरण सगळीकडे निर्माण केले होते. यामध्ये लहान-थोर, इतकेच नाही तर मुली सुद्धा आपला आनंद व्यक्त करत होत्या. मेस्सीमय कोल्हापूर अर्जेंटीनाच्या विजयाचं कोल्हापूरच्या तरुणांनी जोरदार सेलिब्रेशन केलं. हलगीच्या ठेक्यावर बऱ्याच ठिकाणी ताल धरण्यात आला होता. काही तरुणांनी मेस्सीच्या कट आउटला दुधाने अभिषेक केला, तर काहींनी त्याच्या भल्या मोठ्या कट आउटला हार चढवून तिथून फटाक्यांची आतषबाजी केली. एका फुटबॉल वेड्या तरुणाने मेसीच्या प्रेमाखातर आपल्या शरीरावर मेस्सीची जर्सी रंगवून घेतली होती. तर एकाने आपल्या चार चाकी गाडीवर मेस्सीचे मोठे स्टिकर लावून घेतले होते. वेगवेगळ्या मार्गानं कोल्हापूरकरांनी आपले मेस्सी आणि अर्जेंटिनावरचे प्रेम दाखवून दिले. गोल केल्यानंतर लिओनेल मेस्सी आकाशात कोणाकडे पाहतो? कारण आहे खास पोलीस दक्ष! कोणत्याही स्पर्धेची फायनल मॅच जिंकल्यानंतर कोल्हापूरकर छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमून जल्लोष करत असतात. अर्जेंटिनाने फायनल जिंकल्यानंतर तरुणांचे पाय देखील छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे वळू लागले पण या ठिकाणी पोलिसांनी आधीच तयारी केली होती छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पोलीस थांबले होते आणि त्यांनी हुल्लडबाजी करणाऱ्या प्रत्येक तरुणांना परत पाठवलं.. त्यामुळे तरुणांनी बाकीच्या चौकात जाऊन एकच जल्लोष केला. मॅच जिंकल्याचा आनंद व्यक्त करताना कोल्हापूरचे तरुण रस्त्यावरून आणि चौकातून घालायचे नाव घेत नव्हते. दुचाकी आणि चारचाकी वाहनांना चौकातील तरुणांमुळे वाट न मिळाल्याने शहरातील मुख्य चौकात रात्री 12 नंतर ट्रॅफिक जामची परिस्थीती बनली होती. त्यामुळे पोलिसांनी सर्व तरुणांना हुसकावून लावले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या