भाजप नेते किरीट सोमय्या
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज सकाळी दिल्लीत (Delhi) दाखल झाले आहेत. सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) अनेक दिग्गज नेत्यांवर भ्रष्टाचाराचे (Corruption) गंभीर आरोप केले आहेत. याच आरोपांची सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी ते आज दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत ते सहकार (Cooperation), वित्त (Finance) आणि ग्रामविकास (Gramvikas Ministry) विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. या भेटीदरम्यान ते महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या तक्रारीदेखील करु शकतात.
सोमय्या यांनी आपल्या दिल्लीवारी संदर्भात ट्विटरवर माहिती दिली आहे. “मी आज दिल्लीत दाखल झालोय. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर, भावना गवळी, आनंद अडसूळ, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनियमितता आणि फसवणुकीचा पाठपुरावा करण्यासाठी सहकार, अर्थ आणि ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे”, असं सोमय्या ट्विटरवर म्हणाले आहेत.
हेही वाचा : अर्जुन खोतकरांनी 100 कोटींचा घोटाळा केला, किरीट सोमय्यांचा मोठा आरोप सोमय्या हे दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. तसेच खोतकर यांनी शेतकऱ्यांनी कारखान्यासाठी दिलेली 1000 कोटींच्या किंमतीच्या जमीन देखील बळकावण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप सोमय्यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांचं खोतकरांनी खंडन केलं होतं.
किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर सोमय्या यांनी कोट्यवधीच्या घोटाळ्यांचा आरोप केला होता. त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेनेच्या नेत्या भावना गवळी, आनंदराव अडसूळ यांच्यावरही निशाणा साधला. विशेष म्हणजे यापैकी काही नेत्यांच्या घरी, त्यांच्या निकटर्तीयांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने छापे देखील टाकले आहेत. त्यामुळे सोमय्या यांच्या दिल्लीवारीने आणखी काही नेत्यांच्या अडचणींमध्ये वाढ होते का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.