मुंबई, 5 सप्टेंबर: मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी (POK) करून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिनं वादाला तोंड फोडलं आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांबद्दल अविश्वास दाखवल्यानंतर तिच्यावर महाराष्ट्रात सर्व स्तरातून विरोध होत आहे. कंगनाविरुद्ध शिवसेना आणि महाराष्ट्र सरकार असं Tweet वार सुरू असताना तिला रात्री उपरती झाली. कंगनानं एक ट्वीट केलं आहे. मुंबई ही आपली कर्मभूमी असून मुंबईनं मला यशोदामाईसारखं सांभाळलं आहे, असं कंगनानं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, मुंबईशी तुलना POK शी केल्यानंतर कंगनावर चहुबाजुंनी टीकेची झोड उठली आहे. त्यानंतर शुक्रवारी रात्री कंगना हिनं मुंबईबाबतच्या आपल्या भावना ट्वीट करून व्यक्त केल्या आहेत. हेही वाचा… ‘मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच, कंगनाच्या मागे राजकीय पक्ष' अखेर काय म्हणाली कंगना? ‘महाराष्ट्रातील माझ्या मित्राचे आभार मागण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. त्यांना माझ्या बोलण्याचा रोख माहिती आहे. तसेच मुंबई ही माझी कर्मभूमी आहे. मुंबईनं मला यशोदामाईसारखं सांभाळलं आहे. त्यामुळे माझ्या प्रेमाचा पुरावा देण्याची गरज मला वाटत नाही.जय मुंबई जय महाराष्ट्र’
कंगनाच्या पोस्टरला काळं फासलं कंगना राणावत हिच्या मुंबई बद्दलच्या ट्वीट विरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीने ठाण्यात कंगनाच्या पोस्टरला काळं फासलं. तिच्या पोस्टरला जोडे मारले. त्यानंतर भडकलेल्या कंगनाने पुन्हा एक खरमरीत Tweet करत म्हटलं आहे की, “सुशांतला आणि साधूंना मारल्यानंतर आता प्रशासनाविरोधात माझं मत व्यक्त केलं म्हणून माझ्या पोस्टरला जोडे मारताय… मुंबईला रक्ताची चटक लागली आहे वाटतं… “, असं कंगनाने लिहिलं आहे. त्याअगोदर कंगनाने तिला विरोध करणाऱ्यांविषयी खरमरीतपणे हेही लिहिलं आहे, “महाराष्ट्राबद्दल हे असं प्रेम दाखवणाऱ्या सगळ्या चापलुसांनी हे लक्षात घ्या की, मराठी मनाचा अभिमान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांना मोठ्या पडद्यावर दाखवणारी हिंदी चित्रपटांच्या इतिहासातली मी पहिली अभिनेत्री दिग्दर्शक आहे. आणि याच लोकांनी या चित्रपटांना प्रदर्शित होण्याआधी विरोध केला होता.” शिवसेनेचं थेट आव्हान… ‘कंगनाला मुंबईत पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.’ 9 सप्टेंबरला मुंबईत येते आहे. हिंमत असेल तर रोखून दाखवा, असं थेट आव्हानच कंगनाने दिलं होतं. बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौतनं मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत (POK) केली आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर मराठी कलाकरांसह सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. त्यानंतर कंगनानं पुन्हा एकदा ओपन चॅलेंज करत ट्वीट केलं आहे. हेही वाचा… कंगनावर संतापले मराठी कलाकार, सोशल मीडियावरून केला टीकेचा भडिमार कंगना हिच्यावर चहूबाजूंनी टीका होत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा कंगनाचं नाव न घेता तिला फटकारलं आहे. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचं श्राद्ध घातल्याशिवाय राहाणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.