JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीची नाराजी, महाविकास आघाडीत बिघाडी? जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीची नाराजी, महाविकास आघाडीत बिघाडी? जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक नवं विधाण केलं आहे. या विधानामुळे महाविकास आघाडीत सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

जाहिरात

सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत आणि बांधकाम खर्च(अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 26 जानेवारी : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) घटक पक्षांमधील धुसफूस काही केल्या कमी होताना दिसत नाही. दर पंधरा दिवस किंवा महिन्याभरात महाविकास आघाडीत बिघाडी असल्याच्या चर्चांना उधाण येतं. आतादेखील तशा चर्चेसाठी पुन्हा एकदा निमित्त मिळालं आहे. कारण गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक नवं विधाण केलं आहे. आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत (TMC election) शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी (NCP) एकत्र निवडणूक लढणार का? या विषयावर जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी नाव न घेता टोला लगावला. “इतरांची इच्छा असेल तर सोबत राहू. कुणीही राजकीय मग्रुरी दाखवू नये. शिवसेना नेते प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कार्यकर्त्यांना समजावं”, अशा शब्दांत आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या या विधानानंतर महाविकास आघाडीत बिघाडी असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले? “जर इतरांची इच्छा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस हात सोडणार नाही. पण कुठला पक्ष राजकीय मग्रुरीमध्ये आमची सत्ता आहे, आम्ही सत्ता आणू शकतो, आमची सत्ता होती वगैरे सांगत असेल तर मग प्रत्येकाला लढायचे मार्ग मोकळे आहेत. माझी स्थानिक आमदार प्रताप सरनाईक, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की, आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावं आणि एक सक्षम आघाडी बनवू. वर्षोनुवर्षे महापालिका पोखरुन खाललेल्या भाजपला घरी बसवावं”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ( ‘हे कायद्याचे राज्य, ही हिटलरशाही नाही, जितेंद्र आव्हाडांनी पालिका उपायुक्तांना झापले ) काँग्रेसची नेमकी नाराजी काय? महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस नेत्यांना आणि मंत्र्यांना न्याय मिळत नसल्याचा आरोप अनेकदा काँग्रेस मंत्र्यांकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काँग्रेस नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकार काळात काँग्रेस कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याचं विधान केलं आहे. तसेच आपण काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आक्रमक होऊ, असाही इशारा त्यांनी दिलाय. अमित देशमुख काल औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे याआधी काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती. आता हीच धूसफूस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पोहोचल्याची चर्चा आहे. जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना यांच्यातील धुसफूस जुनीच जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना यांच्यातील मतभेद अनेकदा जाहीरपणे समोर आले आहेत. विशेष म्हणजे कळव्यातील खारेगाव उड्डाणपुलाचा लोकार्पण कार्यक्रमात शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याचं स्पष्टपणे दिसून आले होते. या कार्यक्रमात श्रेयवादावरुन बॅनरबाजी बघायला मिळाली होती. तसेच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. या कार्यक्रमादरम्यान भाषण करताना जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिकेचे महापौर नरेश म्हस्के, तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांना टोला लगावला होता. त्याला श्रीकांत शिंदे यांनीदेखील उत्तर दिलं होतं. भर कार्यक्रमात मंचावर हे सगळं घडत होतं. यावेळी एकनाथ शिंदेही मंचावर उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात ठेवून जितेंद्र आव्हाड यांची समजूत काढली होती. या कार्यक्रमानंतर आव्हाड आणि श्रीकांत शिंदे यांनी प्रसारमाध्यमाना प्रतिक्रिया देताना परस्परांवर टीका केल्याचं बघायला मिळालं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या