बीड, 25 डिसेंबर: गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान (Corona pandemic) घातलं आहे. दरम्यानच्या काळात अनेकांनी आपल्या जीवाभावाची माणसं गमावली आहेत. कुणी पोटच्या लेकरांना मरताना पाहिलं तर कुणाचा मायेचा आधार हरवला. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे मृत पावलेल्यांच्या (Corona deaths) नातेवाईकांना सरकारकडून 50 हजार रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. अशात कोरोना विषाणूच्या जीवघेण्या संसर्गातून ठणठणीत बरे झालेल्या लोकांचा समावेश कोरोना मृतांच्या यादीत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंबाजोगाई येथील दोन जिवंत व्यक्तींचा समावेश कोरोना मृतांच्या यादीत आढळला आहे. संबंधित जिवंत व्यक्तींना मृत दाखवून सरकारकडून देण्यात येणाऱ्या 50 हजार रुपयांच्या सानूग्रह अनुदानावर डल्ला मारण्याचा प्रयत्न केल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यानंतर पाटोदा तालुक्यात देखील आणखी दोन जिवंत व्यक्ती आढळले आहेत, ज्यांचा समावेश मृतांच्या यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात जिवंत व्यक्तींना कोरोना मृत दाखवणारं मोठं रॅकेट सक्रिय असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हेही वाचा- भोंगळ कारभार..! कोरोना मृतांच्या यादीत चक्क 216 जिवंत व्यक्ती त्याअनुषंगाने प्रशासनाकडून तपास केला जात आहे. खरंतर बीड जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 838 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. यातील 1800 लोकांच्या नातेवाईकांनी सानुग्रह अनुदान मिळवण्यासाठी अर्ज केले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना तातडीने अर्थसहाय्य करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे तालुका, जिल्हास्तरावर नगरपालिका, गटविकास अधिकारी, आरोग्य विभाग आणि तहसीलदार यांच्या समितीकडून मयतांची यादी तयारी केली जात आहे. हेही वाचा- चिंता वाढली! दादरमधल्या प्रयोगशाळेतच Corona चा शिरकाव, BMC नं उचललं मोठं पाऊल या यादीतील लोकांच्या नावाची खात्री करून घेण्यासाठी संपर्क केला असता, यामध्ये अनेक नागरिक जिवंत असल्याचं समोर येत आहेत. अंबाजोगाईनंतर आता बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात देखील मृतांच्या यादीतील दोन व्यक्ती जिवंत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याव्यतिरिक्त लातूर जिल्ह्यात देखील दोन व्यक्ती जिवंत आढळल्या आहेत. त्यामुळे सानुग्रह अनुदान लाटण्यासाठी बीड जिल्ह्यासह राज्यात मोठं रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.