पाचोरा, 25 मे: जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा (Pachora) याठिकाणी एका पतीनं आपल्या पत्नीची हत्या (Husband killed wife) करून तिचा अपघात झाल्याचा बनाव रचल्याची घटना समोर आली आहे. आरोपी पतीनं पत्नीला नातेवाईकांच्या घरी घेऊन चाललो आहे, असं सांगत वाटेतचं पत्नीचा काटा काढला आहे. हत्या केल्यानंतर आरोपीनं अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला आहे. पण त्याचा हा बनाव फार काळ लपून राहिला नाही. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित विवाहित मृत महिलेचं नाव अश्विनी मुकेश सोनवणे (वय- 20) असून त्या पाचोरा शहरातील राजीव गांधी नगर भागातील रहिवासी आहेत. मृत अश्विनीचं 14 मे 2019 रोजी पाचोरा येथील वाहनचालक मुकेश रमेश सोनवणे याच्याशी लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर काही दिवसांतचं आरोपींनी अश्विनीचा छळ सुरू केला होता. नाशिकमधील एका मुलीशी आपलं प्रेमसंबंध सुरू असल्याचं सांगत आरोपी पती अश्विनीला वारंवार त्रास द्यायचा. त्याचबरोबर चारचाकी घेण्यासाठी माहेरावरून 5 लाख रुपये घेऊन ये, नाहीतर तुला जीवे मारेन अशी धमकीही त्यानं अनेकदा दिली होती. हे वाचा- लग्नाच्या पहिल्या वाढदिवशीच बायको फरार, ब्यूटी पार्लरच्या बहाण्यानं हातावर तुरी दरम्यान, 23 मे रोजी रात्री सोयगाव याठिकाणी नातेवाईकांकडे अश्विनीला घेऊन जात असल्याचा बहाणा करत आरोपी पती मुकेश घराबाहेर पडला. यावेळी त्यानं पाचोरा आणि शेंदुर्णी दरम्यान अश्विनीची हत्या केली आणि चारचाकी वाहन उलटून अश्विनीचा मृत्यू झाल्याची बतावणी केली. यानंतर आरोपीनं तिला पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. एकीकडे वाहन उलटून अश्विनीचा मृत्यू झाला असताना मुकेशला साधं खरचटलंही नाही. यामुळे जावई मुकेशनेच अश्विनीचा खून केल्याचा संशय मृताच्या नातेवाईकांना आला. हे वाचा- आई वडिलांवर पीक कर्जाचं ओझं; परिस्थितीपुढे हतबल तरुणानं उचललं टोकाचं पाऊल यानंतर जावई मुकेश यानेच अश्विनीची हत्या केल्याची फिर्याद मृताची आई संगीता दीपक शेलार यांनी पाचोरा पोलिसांत दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर डॉक्टरांनी आरोपी मुकेशची वैद्यकीय तपासणी केली असता त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केली नसून घटनेचा तपास सुरू आहे.