नागपूर, 26 ऑगस्ट: नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीबाबत अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, त्यांच्या बदलीची मागणी आम्ही कधीच केली नव्हती. त्यांच्यासोबत मतभेद झाले, मात्र ते कामाच्या बाबतीत होते. वैयक्तिक मतभेद कधीच नव्हते. आयुक्तांनी पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून कार्य करावे, हीच आमची अपेक्षा होती, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि महापौर संदीप जोशी यांनी दिली आहे. तसेच तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हेही वाचा… मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारनं घेतले 7 मोठे निर्णय, वाचा एका क्लिकवर.. आणखी काय म्हणाले महापौर? महापौर संदीप जोशी म्हणाले, जनप्रतिनिधी याच शहरात लहानाचे मोठे झाले आहे. या शहराचा कानाकोपरा त्यांना माहिती आहे. नागरिकांच्या समस्या माहिती आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रशासकीय अधिकारी म्हणून आयुक्तांनी प्रत्येक जनप्रतिनिधींशी समन्वय ठेवायलाच हवा. आम्हाला घेऊन चालावे, अशी आमची अपेक्षा होती. आयुक्त तुकाराम मुंढे हे आमचे वैयक्तिक शत्रू नव्हते. त्यामुळे त्यांची बदली झाली असली तरी आम्हाला कुठल्याही प्रकारचा आनंद नाही. लोकांना घेऊन चालले असते तर आम्हाला अधिक आनंद झाला असता. ही बदली शासनाने केली आहे. आता शासन आमचं नाही. सन 2019 पूर्वीची पाच वर्षे वगळता शासन काँग्रेसचं होतं. त्याही काळात अनेक आयुक्त आलेत. परंतु प्रत्येकासोबत आमचे मित्रत्वाचे संबंध होते. यापुढे जे आयुक्त येतील त्यांनी पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवावा, आम्ही ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहू, असेही महापौर संदीप जोशी यांनी सांगितलं आहे. तुकाराम मुंढे मुंबईत! राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आल्या आहेत. त्यात नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे. तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे सचिवपदी बदली झाली. तर त्यांच्या जागी राधाकृष्णन बी. हे नागपूरचे नवीन महापालिका आयुक्त असतील. दरम्यान, तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेत आयुक्तपदी कार्यरत असताना ते सत्ताधारी भाजपविरुद्ध प्रशासन अशा वादात सापडले होते. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्यावर अनेक आरोपही करण्यात आले होते. यावरून तुकाराम मुंडे यांना काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली होती. हेही वाचा…. सायंटिस्ट सांगून तरुणीचं लैंगिक शोषण; हैदराबादच्या ठगास अमरावतीत ठोकल्या बेड्या तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पातून सात जणांना नोकरीवरुन काढून टाकलं होतं. पण तुकाराम मुंढे स्वत: स्मार्ट सिटीचे नियमानुसार सीईओ झाले नव्हते. मग त्यांनी सात कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कसं काढलं? अशाप्रकारची याचिका सात कर्मचाऱ्यांनी नागपूर खंडपीठात दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना तुकाराम मुंढे यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्याचबरोबर भाजपचे नेते आणि महापौर संदीप जोशी आणि नगरसेवकांनी तुकाराम मुंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.