मुंबई, 21 जुलै : महाराष्ट्रातील राजकारणात उद्धव ठाकरे विरुद्ध शिवसेनेमधील युद्ध दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. एकीकडे शिवसेना नेत्यांच्या बंडखोरीमुळे हळूहळू पक्ष तुटत आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा गट दिवसेंदिवस मजबूत होताना दिसत आहे. मात्र अद्याप शिंदेंनी मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. शिवाय शिवसेनेच्या निवडणुकीच्या चिन्हावर नियंत्रण मिळवू शकले नाहीत. यादरम्यान मात्र शिंदे गटातही बंडखोरीची शक्यता ठाकरेंकडून व्यक्त केली जात आहे. अशावेळी एकनाथ शिंदे आता संपूर्ण शिवसेनेला हायजॅक करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. बुधवारी एकनाथ शिंदेंनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. यात त्यांनी शिंदे गटाला शिवसेना पक्षाची मान्यता दिली जावी, अशी मागणी केली आहे. याशिवाय शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाणदेखील त्यांना द्यावं असं या पत्रात म्हटलं आहे. कुठे आहे शिंदेंचं लक्ष.. एकनाथ शिंदेंची नजर आता प्रतिनिधी सभेवर आहे. शिवसेना पक्षाच्या सर्वात मजबूत मानल्या जाणाऱ्या या प्रतिनिधी सभेत 282 सदस्य आहेत. आता या सदस्यातील दोन तृतीयांश म्हणजे 188 सदस्यांना आपल्या गटात आणण्यासाठी शिंदे प्रयत्न करीत आहेत. म्हणजे जर ते या मिशनमध्ये यशस्वी झाले तर शिवसेना आणि उद्धव छाकरे यांच्या अडचणी वाढू शकतात. एमपी आणि एमएलएनंतर संघटनेत फूट आवश्यक… केवळ खासदार आणि आमदारांमधील बंडखोरी म्हणजे पक्षात फूट नसते. तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार, या संघटनेत उभी फूट सिद्ध करणं आवश्यक आहे. जर एकनाथ शिंदे प्रतिनिधी सभेतील 188 सदस्यांचं समर्थन मिळवू शकले तर संपूर्ण पक्षातील फुटाचा दावा अधिक मजबूत होईल. यानंतर शिंदे आपल्या योजनेनुसार, शिवसेनेवर नियंत्रण मिळवू शकतील. शिवसेनेलादेखील या सर्व बाबी माहिती आहेत. यासाठीच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे संघटना मजबूत करण्याचे प्रयत्न करीत आहेत. एकनाथ शिंदेंची काय आहे रणनीती? शिवसेनेच्या संविधान पार्टीच्या प्रमुखापासून ते शाखा प्रमुखापर्यंत एकूण 13 विविध पदं आहेत. ज्यात आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख आणि विभाग अध्यक्ष मिळून प्रतिनिधी सभाचा भाग असतात. या प्रतिनिधी सभेत एकूण 282 सदस्य असतात. या प्रतिनिधी सभेच्या सदस्यांमधील दोन तृतीयांश सदस्यांनी शिंदेंच्या गटाला समर्थन दिलं तर शिवसेना अडचणीत पडू शकते. मात्र शिंदे पडद्याच्या मागून हे सर्व गणित बसवण्याचा प्रयत्न करीत असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये एकूण 14 सदस्यांपैकी 9 सदस्यांना निवडण्याचा अधिकार असतो. तर 5 सदस्यांची निवड पक्षाच्या प्रमुखांद्वारा केली जाते. हे सदस्य प्रत्येक 5 वर्षांमध्ये निवडले जातात. 2018 मध्ये सर्वांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीची सदस्यदेखील पक्षाचे नेते असतात. सध्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आदित्य ठाकरे, गजानन कीर्तिकर, संजय राऊत, रावत दिवाकर राउत, सुभाष देसाई आणि लीलाधर डाके यांचा समावेश आहे.