पालघर 06 ऑक्टोबर: पालघर जिल्ह्याला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला. डहाणू तालुक्यात रात्री 09:33 वाजता हा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.5 एवढी नोंदली गेली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्वेकडे गंजाड धुंदलवाडी दरम्यान आठ किलोमीटर खोलीवर होता. यामुळे कासा व डहाणू परिसरातील अनेक घरांमध्ये भूकंपाच्या धक्का जाणवला व घरातील भांडी पडली. त्यामुळे नागरिक घराबाहेर आले. यापूर्वी दुपारी 03.54 वाजता (2.1), सायंकाळी 05.41 (2.8) व 06.07 (1.3) तीव्रतेचे धक्के बसले होते. पालघर तालुक्यातील बोईसर व तारापूर भागात देखील धक्के जाणवले असल्याची नागरिकांनी माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात भूकंपाचे धक्के बसत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वारंवार धक्के बसण्याचं काय कारण आहे याचा शोध घ्या अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.