उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत
मुंबई, 10 सप्टेंबर : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘न्यूज 18’ ला सर्वात स्फोटक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राज्यातील गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या विविध घडामोडींवर भाष्य केलं. ‘न्यूज 18’ च्या ‘टाऊन हॉल’ या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात फडणवीसांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. या मुलाखतीत त्यांनी अडीच वर्षांपूर्वी शिवसेना आणि भाजप यांच्या तुटलेल्या युतीवरदेखील भाष्य केलं. राज्यात स्थापन झालेलं नवं सरकार आणि महाविकास आघाडी सरकार कोसळणं हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उत्तर आहे. उद्धव ठाकरेंनी युती तोडली होती. त्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसलं. त्याला आता प्रत्युत्तर देण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले. “उद्धव ठाकरे मला उद्देशून अनेकदा आपल्या भाषणात म्हणायचे की, माझं सरकार पाडून दाखवा. ते वारंवार आपल्या भाषणात तसं म्हणायचे. त्यामुळे एकेदिवशी मी सांगितलं की, ज्यादिवशी सरकार कोसळेल त्यादिवशी तुम्हाला कळणारही नाही. आणि तसंच घडलं. 40-50 लोकं चालली गेली तरी त्यांना माहिती पडलं नाही की, त्यांच्या नाकाखालून 40-50 लोकं निघून गेली. असंच होतं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ( मुंबईला शांघाय बनवणार का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उत्तराने सारेच अचंबित ) “एक बात पक्की आहे. ज्यादिवशी त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला होता त्यादिवशी हे निश्चित झालं होतं की याचं प्रत्युत्तर दिलं जाणार. पण ते प्रत्युत्तर कशाप्रकारे दिलं जाणार हे निश्चित नव्हतं. खरंतर परिस्थिती तशी बनत गेली. शिवसेना फुटीमागे एकच व्यक्ती जबाबदार आहे ती व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे. दुसरं कुणीही जबाबदार नाही”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. ‘आम्ही राजकीय पक्ष, फायदा घेणारच’ “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रखर हिंदुत्ववादी होते. पण उद्धव ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका सौम्य झाली होती. मग अशावेळी मत मागायला जाताना लोकांना काय सांगायचं? असा विचार शिवसेना आमदारांना सतावत होता. दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांना शिवसेनेच्या जीवावर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी मजबूत होताना दिसत होती. अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा आम्ही तर राजकीय पक्ष आहोत. त्याचा फायदा तर घेणारच. तो फायदा आम्ही घेतला. पण हे जे काही घडलं ते एका दिवसात नाही घडलं. बऱ्याच कालावधीत हे सगळं घडलं. त्यांच्यासोबत अन्याय झाला. तो अन्याय झाल्यानंतर सर्व आमदार आमच्यासोबत आले”, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिलं. राज्यातील सत्तांतरात आपलादेखील सहभाग, फडणवीसांची कबुली “मी चाणक्य वगैरे नाही. पण जे काही घडलंय त्यामध्ये माझी देखील काहीशी भूमिका होती. यामध्ये आमच्या केंद्रीय नेत्यांची देखील साथ मिळाली. विशेषत: गृहमंत्री अमित शाह ताकदीने आमच्या पाठीमागे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आशीर्वाद होताच. पण या अशाप्रकारच्या रणनीतीमध्ये सहभागी होत नाहीत. त्यांचा पाठिंबा आम्हाला होता”, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. “जी लोकं आमच्यासोबत आली ते मानतात की मोदींच्या नेतृत्वातच देश पुढे जावू शकतो. त्यामुळे सर्वजण आमच्यासोबत आले. चाणक्य वगैरे सोडा. पण या परिवर्तनसाठी कोण जबाबदार आहे? असं विचारलंत तर मी उत्तर देईन - उद्धव ठाकरे. त्याचं क्रेडीट उद्धव ठाकरे यांनाच जाईल. कारण त्यांनी आमच्यासोबत युती तोडली नसती, पोकळ सरकार स्थापन केलं नसतं, ते चालवलं नसतं तर आज जे घडलंय ते काहीच घडलं नसतं. त्यामुळे आजच्या परिस्थितीला खरे जबाबदार तर उद्धव ठाकरे हेच आहेत”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.