सिंधुदुर्ग, 6 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी भाजपचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल काल मोठा गौप्यस्फोट केला होता. नारायण राणेंनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची बदनामी केली. त्याबद्दल आपण त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार केली होती, असं विधान केसरकरांनी काल पत्रकार परिषदेत केली. त्यांच्या या विधानामुळे सिंधुदुर्गाच्या राजकारणात मोठं धूमशान होताना दिसत आहे. विशेष म्हणजे भाजपचे माजी आमदार आणि जिल्हाप्रमुख राजन तेली यांनी केसरकरांना आवरा, असा इशाराच दिला होता. राणे समर्रथकांनी केसरांवर निशाणा साधायला सुरुवात केलेली. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अडचण येते की काय? अशी चर्चा सुरु झाली होती. पण या वादात दीपक केसरकर यांनी माघार घेतली आहे. केरसरकारांनी पत्रकार परिषद घेवून आपण यापुढे राणेंविषयी विधान करणार नाही, असं विधान केलं आहे. दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले? “मी काल जे मुद्दे उपस्थित केले होते त्या मुद्द्यांना बगल दिला जात आहे. उद्धव ठाकरेंकडून आरोप करण्यात आला की, माझ्या कुटुंबावर जेव्हा आरोप झाले तेव्हा तुम्ही गप्प बसले होते, असं ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या त्याच विधानाला मी उत्तर दिलं होतं. आम्ही गप्प बसलो नव्हतो. देशाच्या सर्वोच्च नेत्याकडे याबाबत तक्रारही केली होती”, असं स्पष्टीकरण केसरकारांनी दिलं. ( मंत्रिमंडळ विस्ताराआधीच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मतभेद? कोकणातल्या घडामोडींवरुन महाराष्ट्राच्या राजकारणात धुमशान ) “माझा आणि नारायण राणे यांचा वाद झाला होता हे सर्वश्रूत आहे. पण प्रत्येक घटनेचा संबंध त्याच्याशी जोडणं चुकीचं आहे. मी त्यावेळी त्यांच्या अत्यंत आदरपूर्वक वागलेलो आहे. अनेकवेळेला मी सांगितलं आहे की राणेंसोबत माझा कोणताही वैयक्तिक वाद नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्याबरोबर काम करण्याची वेळ आली तर मी निश्चितपणे तयार आहे”, असं दीपक केसरकर म्हणाले. “मी शरद पवारांच्या संदर्भात वक्तव्य करणं चुकीचं आहे, त्यामुळे मी त्यांचं नाव घेवून काहीच बोलत नाही. त्यांच्याबद्दल बोललो की वाईट बोललो, असं होतं. तसंच आता नारायण राणे यांच्याबद्दल बोललो की माझा त्यांच्यासोबत आधी झालेल्या वादाशी संबंध जोडला जातो. त्यामुळे यापुढच्या काळात मी नारायण राणे यांचं नाव घेणार नाही. विषयानुरुप बोललं पाहिजे. माझ्या मुद्द्याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं”, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली. नेमकं प्रकरण काय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि भाजपचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्यातील राजकीय मतभेद हे सर्वश्रूत आहेत. महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजप यांची सत्ता स्थापन झाल्याने केसरकर आणि राणे यांच्यातील राजकीय वाद निवळेल, अशी आशा होती. पण सिंधुदुर्गातील राजकारण वेगळ्याच दिशेला जातंय. दीपक केसरकर यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. नारायण राणे यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची बदनामी केली. राणेंच्या या कृतीबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार केली होती, असा धक्कादायक खुलासा केसरकर यांनी नुकतंच पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर राणे-केसरकर यांच्यातील मतभेद शिगेला पोहोचताना दिसत आहे. विशेष म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केसरकारांना आवरा, असा इशाराच दिला आहे. त्यामुळे राणे-केसरकर यांच्यातील वाद वाढण्याचा अंदाज वर्तवला जात होता. पण राणे-केसरकर यांच्यातील वाद वाढला तर सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे केसरकर यांनी या वादातून माघार घेतल्याचं चित्र आहे.