गडचिरोली, 14 जुलै: राज्यात कोरोना व्हायरसनं आता थैमान घालतं आहे. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांसोबतच आता अन्य शहर आणि ग्रामीण भागातही कोरोनाचं संकट आता आणखी गडद होताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं पसरत आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं शंभरी ओलांडली आहे. केंद्रीय राखीव दलाचे (CRPF) 11 तर राज्य राखीव दलाचे (SRPF) 29 अशा तब्बल 40 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 186 वर पोहोचली आहे. त्यापैकी आतापर्यंत 71 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 114 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये SRPF जवानांची संख्या सर्वाधिक आहे. हेही वाचा… महिलेने 90 वर्षीय पतीला रॉकेल टाकून पेटवले, नंतर स्वत:लाही संपवलं काल (सोमवार) CRPFचे 11 जवान पॉझिटिव्ह आढळून आले होते तर आज मंगळवारी SRPFच्या तब्बल 29 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. माओवादीविरोधी अभियानावर जिल्ह्यात तैनात असलेल्या निमलष्करी दलाच्या तब्बल 103 जवानांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात सर्व जवानांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलं आहे. धुळ्याहून आलेल्या 150 SRPF पैकी 29 जवानांच कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ही 150 जवानांची तुकडी गेल्या आठवड्यात धुळे येथून गडचिरोलीला दाखल झाली होती. आत्तापर्यंत जिल्ह्यात CRPFचे 72, SRPF चे 29, BSFचे 2 असे मिळून 103 जवान कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दरम्यान, संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार उडवून दिला आहे. देशातील कोरोनाबाधित रग्णांची संख्या आता 9 लाखांहून जास्त आहे. गेल्या 24 तासांत देशात 28 हजार 498 रुग्ण सापडले तर 553 जणांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 9 लाख 7 हजार 645 झाला आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 3 लाख 11 हजार 565 सक्रीय रुग्ण आहेत. तर 5 लाख 71 हजार 460 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. देशात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असली तरी आतापर्यंत 23 हजार 727 लोकांचा मृत्यूही झाला आहे. हेही वाचा… कधी होणार रस्ते? लाकडाला झोळी करून आजोबांना नेले दवाखान्यात, रत्नागिरीतला VIDEO भारतानं केवळ 166 दिवसांत 9 लाखांचा आकडा पार केला. जगातील इतर देशांच्या तुलनेत एकाच दिवसात देशात सर्वात जास्त रुग्ण सापडत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी देशात 28 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली.