नांदेड, 17 ऑगस्ट : कारोना काळात रस्त्यावर आणि तसेच शहरातील ठिकठिकाणचा परिसर प्रतिबंधित करण्यासाठी लाकडी बॅरिकेटिंग करण्यात आलं होतं. शिवाय नाना-नानी पार्क येथे तपासणीसाठी तंबूचा शेड उभारण्यात आला होता. नांदेड शहरात एका खाजगी कंत्राटदाराला हे काम सोपवण्यात आले होते. या ठेकेदाराने त्यासाठी तब्बल 2 कोटी 44 लाख रुपयांचे बिल नांदेड महापालिकेकडे सादर केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. लाकडी बॅरिकेटिंगसाठी जवळपास अडीच कोटी रुपये बिल सादर झाल्याने यावर टीका होऊ लागलीय. विशेष म्हणजे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांना कुठलीही चर्चा करु न देता संपूर्ण अजेंडा पास करून घेण्यात आला. सभागृहात विषय पत्रिकेवर चर्चा न करता घाई गरबडीत अजेंडा पास करण्यात आल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. अडीच कोटी रुपयांमध्ये लोखंडी फिरते बॅरिकेट्स खरेदी करता आले असते. शिवाय हे बॅरिकेट्स परत भंगारमध्ये विकल्यास त्यातून अर्धे पैसे परत महापालिकेला मिळाले असते, असा आक्षेप विरोधकांनी नोंदवलाय. ( चित्रपटालाही लाजवेल इतका भयानक घटनाक्रम, प्रसिद्ध व्यावसायिकासोबत नेमकं काय घडलं? सांगली जिल्हा हादरला ) सार्वजनिक बांधकाम विभागाने निकषानुसार गुत्तेदाराला बिल बनवून दिले आणि गुत्तेदाराने ते बिल पालिकेला सादर केले. पण त्याची उलटतपासणी न करता प्रशासन आणि सत्ताधाऱ्यानी बिल मंजूर केले. यात भ्रष्टाचार असल्याचा भाजपचा आरोप आहे. बिलात प्रशासन आणि सत्ताधारी काँग्रेसने संगनमत केल्याचा आरोप भाजपाने केला. या प्रकरणी विरोधकाडून विरोध होत असतांना सत्ताधारी मात्र याबाबत काहीच उत्तर देत नाहीयत. पदाधिकारी आणि अधिकारी देखील या विषयी बोलायला तयार नाहीत. महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. 82 पैकी 72 नगरसेवक काँग्रेसचे आहेत. बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी मनमानी निर्णय घेन्याचा सपाटा लावला आहे.