बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा प्रचंड गोंधळ
ठाणे, 24 ऑगस्ट : बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची आज प्रचंड गर्दी बघायला मिळाली. संध्याकाळची वेळ होती. शेकडो बदलापूरकर यावेळी मुंबई शहर आणि उपनगरातील विविध भागांमधून नोकरी करुन संध्याकाळी लोकलने घरी परतत होते. नेमकं याच वेळी बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा गोंधळ बघायला मिळाला. त्यामुळे रेल्वे स्थानकावर पोलिसांची प्रचंड मोठी कुमक बघायला मिळाली. पण प्रवाशी आंदोलन मागे घेण्यास तयार नव्हते. अखेर प्रवाशांच्या आंदोलनाची दखल घेवून रेल्वे प्रशासनाला महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागला. खरंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर तीन दिवसांपासून प्रवाशांचं आंदोलन सुरु होतं. एसी लोकल बंद करण्यात यावं यासाठी प्रवाशांचं आंदोलन सुरु होतं. प्रवाशांनी आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी आज स्टेशन मास्तरला घेराव घातला. रेल्वे प्रशासनाने वाढवलेल्या एसी लोकलमुळे सामान्य फास्ट लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या दोन रद्द झालेल्या गाड्यांची गर्दीचा भार पर्यायाने वेळेनुसार असणाऱ्या तिसऱ्या गाडीवर पडत होता. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळेच बदलापूरकर प्रचंड आक्रमक झाल्याचं चित्र आहे.
( मुंबईतलं प्रसिद्ध ललित हॉटेल उडवण्याची धमकी देणाऱ्यांच्या नांग्या ठेचल्या, पोलिसांची मोठी कारवाई ) अखेर रेल्वे प्रवाशांच्या आक्रमकतेपुढे रेल्वे प्रशासनाने गुडघे टेकले. रेल्वे प्रशासनाने एसी लोकल रद्द करण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाच्या या आंदोलनाची दखल घेत रेल्वे प्रशासनाला याबाबतचा निर्णय घ्यावा लागला. प्रशासनाने याबाबतचा निर्णय जाहीर केल्यानंतर प्रवाशी संघटनांनी गेल्या तीन दिवसांपासून सुरु केलेलं आंदोलन स्थगित केलं.