भिवंडी, 07 मे: भिवंडी परिसर एका भीषण आगीच्या (Fire at Bhiwandi) घटनेने हादरला आहे. याठिकाणी एशियन पेंट्सच गोदामाला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अद्यापही ही आग विझवण्याचे (दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास) प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर याठिकाणी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भिवंडीमध्ये एशियन पेंट्सच्या गोदामाला (Asian Paints Godown Fire Bhiwandi) आग लागल्याची घटना घडली. याठिकाणी लागलेल्या आगीमध्ये साधारण 15 ते 17 गोदामं जळून खाक झाल्याची माहिती मिळते आहे. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade at Fire Spot) 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
भिवंडी तालुक्यातील मानकोली याठिकाणी हरिहर कंपाउंड मधील एशियन पेंटच्या गोदामाला भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी भिवंडी, ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 4 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे वान आग विझविण्याचा प्रयत्न करत असून या कंपाउंड मध्ये एकूण 21 गोदामं आहेत. यापैकी 15 ते 17 गोदामे जळून खाक झाली असल्याची माहिती मिळते आहे. यामध्ये लाखो रुपयांचं पेंट, केमिकल, ब्रश जळून खाक झाले आहेत. दरम्यान ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलं नाही आहे. सुदैवाची बाब म्हणजे या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं समोर आलेलं नाही.