औरंगाबाद, 8 ऑगस्ट : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) त्यांच्या बिनधास्त बोल आणि राजकीय भूमिकांमुळे सतत चर्चेत असतात. TET घोटाळ्याच्या यादीत अब्दुल सत्तार यांच्या तीन मुली आणि एका मुलाचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष: अब्दुल सत्तार यांच्या मुलीला 2010 पासून ते आजपर्यंत पगार मिळत असल्याचंही समोर आलं आहे. सत्तार यांची मुलगी हीना कौसर अब्दुल सत्तार शेख या टीईटी परीक्षेत अपात्र असताना 2017 पासून त्यांना पगार कसा मिळत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर याची कडक चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिक्षण विभागाच्या रेकॉर्डनुसार, 2017 पासून ते जुलै 2022 या वर्षांमध्ये हीना शेख हिला पगार मिळाला आहे. यादरम्यान हीनाला मासिक वेतन हे 40 हजारांपर्यंत मिळत असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे खुद्द अब्दुल सत्तार यांनीच त्यांची मुलगी टीटीईटी अपात्र असल्याची माहिती माध्यमांना दिली आहे. त्यामुळे जर त्या अपात्र होत्या तर मग त्या पगार कुठल्या निकषावर उचलतात हाही प्रश्न या निमित्ताने उभा राहत आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयातून पात्रता निकष पडताळणी केली जाते त्यानुसार आमच्या कार्यालयातून पगार पत्रक निघतात असेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. अब्दुल सत्तारांचा गेम? राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा 60:40 फॉर्म्युला ठरल्याने शिंदे गटाला 16 किंवा 17 मंत्री पद मिळणार आहेत. 50 जणांमध्ये 17 मंत्री पद विभागणे शिंदे यांच्यासाठीही अडचणीचे आहे. 17 जणांमध्ये आपले नाव लागावे यासाठी धडपड सुरू आहे. सर्वच बंडखोर मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातून 5 बंडखोर आहेत. या 5 जणांमधून केवळ दोघांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. सत्तार यांचा मंत्रिमंडळामध्ये प्रबळ दावा असल्यानेच नेमकी आज लिस्ट आली आणि लिस्ट मध्ये सत्तार यांच्या चार अपत्यांची नावही आली. हा योगायोग नाही. सत्तार यांच्या मार्गात काटे टाकण्याचे राजकीय षडयंत्र असल्याची चर्चा आहे.