भाजप नेते प्रवीण पोटे यांच्यावर अटकेची कारवाई
अमरावती, 17 नोव्हेंबर : अमरावतीत झालेल्या हिंसाचारा प्रकरणी (Amravati Violence) पोलिसांचं अटकसत्र अद्यापही सुरुच आहे. पोलिसांनी काल (16 नोव्हेंबर) भाजप नेते आणि राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांच्यासह 14 जणांना अटक केली होती. या 14 जणांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. विशेष म्हणजे अमरावती पोलिसांनी हे अटकसत्र आजही सुरुच ठेवलं आहे. पोलिसांनी आज भाजप नेते आणि माजी पालकमंत्री प्रवीण पोटे (Pravin Pote) यांच्यासह दहा जणांवर अटकेची कारवाई केली.
अमरावती पोलिसांच्या या कारवाईवर प्रवीण पोटे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांवर निशाणा साधला. “अमरावती हे काश्मीर नाही. अनेक विद्यार्थ्यांच्या आज परीक्षा आहेत. अनेक विद्यार्थ्यांना पेपर सोडवायचे आहेत. काही लोकांना वेगवेगळे फॉर्म भरायचे आहेत. पण शहरात इंटरनेट बंद ठेवण्यात आलं आहे. काश्मीर सारखी परिस्थिती या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. असं होता कामा नये. हिंदू ज्याप्रमाणे आपण पेटलेला पाहिला, हिंदूंनी फक्त काडी दाखवलेली आहे. अजून काडी मारलेली नाहीय. जर काडी मारली तर हा हिंदुस्तान पेटल्याशिवाय राहणार नाही. मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सांगतो, तुम्ही हिंदूंना चिरडू नका. हिंदूना चिरडलं तर तुमचं आम्ही काहीच ठेवणार नाही”, असं प्रवीण पोटे म्हणाले.
हेही वाचा : विदर्भाच्या मुद्द्यावरून गडकरींचं कौतुक करत शरद पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले…
अमरावतीत 12 आणि 13 नोव्हेंबरला हिंसाचार झाल्यापासून शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून शहरात संचारबंदी आहे. पण सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. त्यामुळे पोलीस आणि प्रशासन संचारबंदी मागे घेण्याबाबत टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यातील पहिला टप्पा आज पार पडला आहे. अमरावतीत आज संचारबंदीत काहिशी शिथिलता देण्यात आली आहे. सर्वसामान्यांना दुकाने किंवा इतर ठिकाणी महत्त्वाच्या कामासाठी जायचं असल्यास दुपारी 12 ते 4 हा वेळ देण्यात आला आहे. हेही वाचा : पो त्यात बांधलेल्या अवस्थेत नदीत आढळला मृतदेह, खळबळजनक घटनेनं कराड हादरलं!
दरम्यान, अमरावतीत सध्या इंटरनेट सेवा अद्यापही ठप्पच आहे. ही सेवा कधी सुरु होईल याबाबत अद्याप माहिती जारी करण्यात आलेली नाही. शहरात इंटरनेट बंदचा हा पाचवा दिवस आहे. या हिंसाचारा प्रकरणी तपास करत असताना सोशल मीडियातूनच या हिंसाचारास ठिणगी पडली, अशी माहिती समोर आलीय. त्यामुळे पोलीस आरोपींच्या शोधात आहे. पण सध्या घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील इंटरनेट सेवा अद्याप बंदच ठेवण्यात आली आहे.