JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत सर्वात मोठी बातमी! संपाची नोटीस देणारे अजय गुजर यांची संप मागे घेण्याची घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत सर्वात मोठी बातमी! संपाची नोटीस देणारे अजय गुजर यांची संप मागे घेण्याची घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्या एसटी कर्मचारी संघटनेने 21 ऑक्टोबर 2021 रोजी राज्य सरकारला सर्वात आधी संपाची नोटीस दिली होती त्या संघटनेचे नेते अजय गुजर यांनी संपातून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 डिसेंबर : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्या एसटी कर्मचारी संघटनेने 21 ऑक्टोबर 2021 रोजी राज्य सरकारला सर्वात आधी संपाची नोटीस दिली होती त्या संघटनेचे नेते अजय गुजर यांनी संपातून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. गुजर यांची आज परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत मंत्रालयात जवळपास पाच तास चर्चा झाली. या चर्चेनंतर गुजर यांनी संपातून माघार घेत असल्याची घोषणा केली. तसेच आपण संपकरी कर्मचाऱ्यांना आवाहन करु, आझाद मैदानात जाऊ, असंही ते म्हणाले. परिवहन मंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. अजय गुजर नेमकं काय म्हणाले? “एसटी संपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत दिल्लीत चर्चा झाली. विलीनीकरणा संदर्भात न्यायालय जो निर्णय देईल तो सरकार आणि कर्मचारी आम्हा दोघाना मान्य असेल. आत्महत्याग्रस्त एसटी कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपये आर्थिक मदत  मिळावी आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी मिळावी. करोना काळात 306 कर्मचारी मृत्यू पावले. त्यांना शासन निर्णयाप्रमाणे 50 लाख रुपये देण्यात यावे. आतापर्यंत 10 जणांना ही मदत देण्यात आलीय. उर्वरीत कामगारांच्या कुुटुंबांना लवकरच नीधी देण्यात येणार आहे. संपकरी ST कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी विलीनीकरणा संदर्भात आहे. न्यायालयाने आमच्या विरोधात जरी निर्णय दिला तरी आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देऊ. ST कर्मचाऱ्यांनी 22 डिसेंबरपासून रात्री 12 वाजेपासून कामावर रुजू व्हावे. ST संपाची नोटीस आम्ही दिली होती. त्यामुळे आमची संघटना संप मागे घेत आहे”, अशी घोषणा अजय गुजर यांनी केली. हेही वाचा :  एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात पाच तास खलबतं, नेमक्या वाटाघाटी काय झाल्या? अनिल परब नेमकं काय म्हणाले? आमच्याकडून वारंवार चर्चेचं आवाहन करण्यात येत होतं. आमच्या चर्चेला प्रतिसाद देत एसटी कर्मचारी संघटनेचे अजयकुमार गुजर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आमच्याशी चर्चा केली. या चर्चेअंती आम्ही काही गोष्टी मान्य केल्या आहेत. विलीनीकरणाचा मुद्दा त्रिसदस्यीय समितीसमोर आहे. त्या समितीचा जो निर्णय असेल तो आम्हाला आणि कर्मचाऱ्यांना मान्य असेल. आर्थिक मागण्यांबाबत शासकीय कर्मचाऱ्यांसारखं वेतन मिळावं, अशी त्यांची मागणी आहे. आम्ही मूळ पगारात वाढ केली आहे. पण त्या विषयावर आम्ही चर्चेस तयार असल्याचं मान्य केलं आहे. कामगार कामावर रुजू झाले आणि डेपो सुरु झाले तर निलंबन किंवा बडतर्फ करण्याची कारवाई मागे घेऊ. फक्त ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल आहेत त्यांची संबंधित प्रकिया पूर्ण करुन कारवाई मागे घेऊ. आंदोलक कर्मचारी संपावर ठाम दुसरीकडे मुंबईच्या आझाद मैदान येथे आंदोलन करणाऱ्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी अजय गुजर यांच्या निर्णयाला तीव्र शब्दात विरोध केला आहे. आपलं नेतृत्व अजय गुजर करत नसून वकील गुणरत्न सदावर्ते करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच एसटीचं जोपर्यंत राज्य शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या