सोलापूर, 23 नोव्हेंबर : एमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) हे आज सोलापुरात (Solapur) दाखल झाले. यावेळी त्यांच्याकडून एक चूक झाली. या चुकीमुळे त्यांना दंड भरावा लागला आहे. ओवेसी हे सोलापूरला आल्यानंतर त्यांनी नंबरप्लेट नसलेल्या एका गाडीतून प्रवास केला. त्यांच्या याच चुकीवर वाहतूक पोलिसांनी ओवेसी यांना दंड आकारला. ओवेसी यांनी नियमांनुसार आणि शांतपणे 200 रुपये दंड देखील भरला. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
असदुद्दीन ओवेसी यांच्या या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत ते एका नंबरप्लेट नसलेल्या गाडीत दिसत आहेत. या गाडीतून उतरण्याआधी ते मास्क लावायचं विसरले नाहीत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक आहे. या नियमाचं ओवेसी यांनी पालन केलं. हेही वाचा : धडाकेबाज राज्यमंत्री बच्चू कडू ! जलसंपदा विभागात धाड, कामचुकार अधिकाऱ्यांना दणका
महाराष्ट्रात आगामी काळात अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओवेसी हे कामाला लागले आहेत. याच तयारीचा एक भाग म्हणून ओवेसी सोलापुरात आले आहेत. ते गेल्या महिन्यातच औरंगाबादच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते. त्यानंतर ते आज सोलापुरात आले आहेत. यावेळी महापालिका निवडणुकांमध्ये सर्वच जागांवर निवडणुका लढविण्याचा निश्चय ओवेसींनी केला आहे. त्यासाठी उमेदवारांची निवड देखील केली जात आहे. दरम्यान, ओवेसी यांची 27 नोव्हेंबरला मुंबईच्या बेकेसी येथे एक रॅली देखील होणार होती. पण त्यांच्या या रॅलीला कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली. हेही वाचा : परमबीर सिंग ‘फरार’, जुहूतल्या फ्लॅटच्या दरवाज्यावर कोर्टाची ऑर्डर
कोरोना संकटामुळे राज्यातील अनेक मोठ्या शहरांमधील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे अनेक महापालिकेच्या तारखा देखील संपल्या आहेत. त्यामुळे तिथे सध्या प्रशासकीय राजवट सुरु आहे. कोरोना संक्रमणाचा वेग थोडा मंदावला आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यातील महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजू शकण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. त्यामुळे राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. प्रत्येक पक्षाला स्वत:ला जास्त जागांवर विजय मिळावा यासाठी प्रयत्न करतोय. यासाठी इतर पक्षातील नगरसेवकांना फोडून आपल्या पक्षात घेण्याचे सुद्धा प्रयत्न केले जात असल्याचं समोर येतंय. याचं ताजं उदाहरण म्हणजे कल्याणमध्ये काल चार भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेला आणखी ताकद मिळाली आहे.