नवी दिल्ली, 23 मार्च : देशात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Corona Vaccination) कार्यक्रम सुरू आहे. भारत बायोटेकची (Bharat Biotech) कोव्हॅक्सिन (Covaxin) आणि सीरम इन्स्टिट्यूटने (SII) ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनेका कंपनी यांच्या लशीपासून विकसित केलेली कोविशिल्ड (Covishield) या दोन लशी (corona vaccine) दिल्या जात आहेत. तसंच पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा, अशा मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या होत्या. दरम्यान, केंद्र सरकारने जारी केलेल्या ताज्या सूचनांनुसार कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधला कालावधी वाढवण्यात आला आहे. तशा आशयाचं पत्र केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना पाठवलं. मात्र हे असं का करण्यात आलं, अशी शंका सर्वांच्याच मनात उपस्थित झाली. 16 जानेवारीपासून देशात लसीकरण सुरू झालं असून, एक मार्चपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला. दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांवरील नागरिक, तसंच 45 वर्षांवरील व्याधिग्रस्त नागरिकांना लस दिली जात आहे. एक मार्चपासून ज्यांना लस देण्यात आली, त्यांना दुसरी लस देण्याचा कालावधी आठ आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समूह आणि लसीकरण कार्यक्रमावर लक्ष ठेवून असलेल्या तज्ज्ञांच्या गटाने शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार, दोन डोसमधला कालावधी चार ते सहा आठवड्यांऐवजी चार ते आठ आठवडे असला पाहिजे, असा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिला. त्यावर विचार करून सरकारने हा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आणि तसं पत्र राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलं. हे वाचा - कोरोना लशीचा दुसरा डोस आता तुमच्या हातात; लसीकरणाच्या नियमात मोठा बदल शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगात हे सिद्ध झालं, की कोविशिल्डचा दुसरा डोस सहा ते आठ आठवड्यांनी घेतला, तर तो अधिक प्रभावी ठरतो; मात्र हे अंतर आठ आठवड्यांपेक्षा अधिक असू नये, असंही शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. लँसेट (Lancet) हे जगप्रसिद्ध नियतकालिक आणि शास्त्रज्ञांच्या हवाल्याने ‘न्यूज 18’ने याबद्दल संशोधन सुरू असल्याचं वृत्त आधीही दिलं होतं. आता संशोधनाचा निष्कर्ष आल्यामुळे कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधलं अंतर दोन महिन्यांपर्यंत असावं आणि त्या दृष्टीने योग्य ती व्यवस्था राज्य सरकारने कराव्यात, असं पत्र केंद्राने लिहिलं आहे. भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या दोन्ही संस्थांना केंद्र सरकारने पुढच्या लसीकरणासाठी एकूण 12 कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. त्यापैकी 10 कोटी डोस कोविशिल्डचे, तर दोन कोटी डोस कोव्हॅक्सिनचे आहेत. जुलैअखेरपर्यंत भारताने 30 कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. हे वाचा - मोदी सरकारचा मोठा निर्णय; 45 पेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना मिळणार कोरोना लस आता देशभर अनेक ठिकाणी कोरोनाच्या प्रसाराने (Pandemic) पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिक कोरोनाप्रतिबंधक लस टोचून घेण्यास तयार होतील, असं तज्ज्ञांना वाटतं आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार, 22 मार्चपर्यंत 4.50 कोटी जणांना लस देऊन झाली होती. आता दोन डोसमधला कालावधी वाढवण्यात आल्यामुळे पहिला डोस जास्त जणांना मिळण्याची शक्यताही वाढली आहे.