चिरफाड न करता 30 मिनिटांत रिपोर्ट हातात
मुंबई, 8 ऑक्टोबर : एखाद्या व्यक्तीचा संशयास्पद किंवा दुर्घटनेत मृत्यू झाला किंवा त्याच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट असेल तर पोस्टमॉर्टेम अर्थात शवविच्छेदन केलं जातं. या प्रक्रियेत शरीराचं विच्छेदन करून तपासणी केली जाते आणि त्यानंतर मृत्यूच्या कारणासंदर्भातला अहवाल दिला जातो. देशभरात गेल्या कित्येक वर्षांपासून ही पद्धत सुरू आहे; मात्र आता या प्रक्रियेतही डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. व्हर्च्युअल पोस्टमॉर्टेम ही नवीन पद्धत मृत्यूचं कारण शोधण्यासाठी वापरली जात आहे. देशात या तंत्राचा वापर सुरू झाला आहे. सामान्य पोस्टमॉर्टेम आणि व्हर्च्युअल पोस्टमॉर्टेममध्ये बराच फरक आहे. पोस्टमॉर्टेम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर शरीराचं विच्छेदन करून त्याची तपासणी केली जात असल्याचं चित्र उभं राहतं. खरंतर या गोष्टी सर्वसामान्य माणसाला भीतिदायक वाटतात; पण आता डिजिटल तंत्राचा वापर करून व्हर्च्युअल पोस्टमॉर्टेम करण्याकडे कल वाढला आहे. जगातले अनेक देश ही पद्धत वापरत आहेत. भारतातदेखील ही पद्धत अवलंबली जात आहे. व्हर्च्युअल पोस्टमॉर्टेमला व्हर्च्युअल अॅटॉप्सी असंही म्हटलं जातं. यात प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीनं संपूर्ण शरीराची तपासणी केली जाते. भारतात 2020 मध्ये व्हर्च्युअल अॅटॉप्सीला मान्यता देण्यात आली. तत्कालीन केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी ही मान्यता दिली होती. प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं नुकतंच निधन झालं. निधनानंतर त्यांचा व्हर्च्युअल पोस्टमॉर्टेम करण्यात आलं होतं. राजू यांच्या पार्थिवाचं विच्छेदन करू नये, अशी त्यांच्या कुटुंबीयांची भूमिका होती; पण पोलीस केस झाल्यानं पोस्टमॉर्टेम करणं गरजेचं होतं. त्यामुळे व्हर्च्युअल अॅटॉप्सी करण्याचा निर्णय घेतला गेला. वाचा - लिवरसाठी संरक्षण कवच म्हणून काम करतं हनुमान फळ, इतके आहेत फायदे पोस्टमॉर्टेममध्ये शरीरावर छेद घेऊन आतल्या अवयवांची तपासणी केली जाते; पण व्हर्च्युअल पोस्टमॉर्टेममध्ये शरीर फाडावं लागत नाही. यात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. तज्ज्ञ डिजिटल कॅमेरा, एक्स रे, एमआरआय, तसंच अन्य आधुनिक यंत्रांच्या मदतीनं शरीराची तपासणी करतात. या प्रक्रियेच्या मदतीनं तपासणी केल्यास मृत व्यक्तीच्या रिपोर्टवर कोणताही परिणाम होत नाही. व्हर्च्युअल पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट हा सर्वसाधारण पोस्टमॉर्टेमइतकाच अचूक असतो. सामान्य पोस्टमॉर्टेमच्या तुलनेत व्हर्च्युअल पोस्टमॉर्टेम कमी वेळात पूर्ण होतं. यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी फार वेळ वाट पाहावी लागत नाही, असं तज्ज्ञांनी सांगितलं. ही प्रक्रिया विशेषतः अशा व्यक्तींसाठी अवलंबली जाते, ज्यांचे नातेवाईक धार्मिक कारणांमुळे शरीराच्या विच्छेदनास विरोध करतात. यूएईपासून इस्रायलपर्यंत अनेक देशांमध्ये या प्रक्रियेचा वापर केला जातो. तज्ज्ञांच्या मते, व्हर्च्युअल पोस्टमॉर्टेम ही एक प्रकारची रेडिओलॉजिकल टेस्ट आहे. या टेस्टच्या माध्यमातून शरीरातल्या अवयवांचे नुकसान, रक्ताच्या गुठळ्या जमा होणं किंवा अंतर्गत जखमांविषयी माहिती मिळवली जाते.
सामान्य पोस्टमॉर्टेम आणि व्हर्च्युअल पोस्टमॉर्टेम या दोन्ही प्रक्रियांची तुलना करायची झाली तर सामान्य पोस्टमॉर्टेमसाठी किमान अडीच तास लागतात; पण व्हर्च्युअल अॅटॉप्सी ही प्रक्रिया केवळ 30 मिनिटांत पूर्ण होते. तसंच यासाठी खर्चदेखील कमी येतो. व्हर्च्युअल अॅटॉप्सी प्रक्रियेची सुरुवात स्वीडनमध्ये झाली. त्यानंतर अन्य देशांनी या प्रक्रियेचा अवलंब सुरू केला. सध्या जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अनेक युरोपीय देशांमध्ये व्हर्च्युअल अॅटॉप्सीचा वापर केला जातो. जगात असे अनेक देश आहेत, जिथे काही समुदाय मृत्यूनंतर नातेवाईकाच्या शरीराचं विच्छेदन करण्यास परवानगी देत नाहीत. त्यामुळे तिथं ही पद्धत वापरली जाते.