vastu tips
मुंबई, 12 नोव्हेंबर : जीवनात सुख-समृद्धी, यश मिळावं, घरात शांतता आणि सकारात्मकता राहावी, यासाठी आपण अनेक गोष्टी करतो; पण यापैकी सर्वच गोष्टी आपल्याला मिळतात असं नाही. घराची रचना, घरातल्या वस्तूंची मांडणी वास्तुशास्त्रातल्या नियमांनुसार असेल, तर या गोष्टी सहज साध्य होऊ शकतात; पण घराची रचना सदोष असेल तर अपयश, आजारपण, दारिद्र्य यांसारख्या गोष्टींचा सामना करावा लागतो. नुकताच हिवाळा सुरू झाला आहे. हा ऋतू सर्वांना आवडतो. वास्तुशास्त्रानुसार हिवाळ्यात काही उपाययोजना केल्या तर घरातली सकारात्मकता, समृद्धी कायम राहते. तसंच घरातल्या सदस्यांचं आरोग्यदेखील चांगलं राहतं. `आज तक`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हिवाळा सुरू होताच अनेकांच्या जीवनशैलीत एकदम बदल होतो. कारण हा ऋतू आपल्या जीवनात आणि सभोवतालच्या वातावरणात बदल घेऊन येतो. वास्तुशास्त्रात हिवाळ्याला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार हिवाळ्यात घरात काही बदल करणं गरजेचं असतं. या ऋतूत वास्तूशी निगडित दोष नुकसानदायक ठरू शकतात. त्यामुळे हिवाळा सुरू होताच घरात काही बदल तातडीने करावेत. नोकरी, व्यवसाय किंवा खासगी जीवनातल्या अडचणींमुळे अनेक जण तणावाखाली असतात. तुम्हालाही या गोष्टींशी संबंधित समस्या जाणवत असतील, तर हिवाळ्यात घरात दक्षिण दिशेला लाल रंगाची मेणबत्ती लावावी. दक्षिण दिशेला लाल रंगाच्या मेणबत्ती लावल्याने घरातली नकारात्मकता दूर होते आणि मनःशांती लाभते. हेही वाचा - तुमच्या घरातील तुळशीचं रोप वारंवार कोमेजतंय? जाणून घ्या असं होण्यामागची कारणं हिवाळ्यात घरात पांढऱ्या रंगाचे दिवे वापरण्याऐवजी पिवळ्या रंगाच्या दिव्यांचा वापर करावा. पिवळा हा उष्ण रंग मानला जातो. या दिव्यांच्या प्रकाशामुळे हिवाळ्यात घरात सकारात्मकता पसरते. घराच्या ज्या कोपऱ्यांमध्ये अंधार असतो, त्या ठिकाणी या पिवळ्या दिव्यांचा वापर करावा. थंडी जाणवू नये, यासाठी अनेक जण शेकोटीचा वापर करतात. थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवण्याचा विचार करत असाल, तर ही शेकोटी घराच्या आग्नेय किंवा वायव्य कोपऱ्यात पेटवावी. वास्तुशास्त्रानुसार, लख्ख सूर्यप्रकाश हे सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. ज्या ठिकाणी सूर्याची किरणं पोहोचतात तिथं कधीच नकारात्मक ऊर्जा राहत नाही, असं म्हटलं जातं. त्यामुळे हिवाळ्यात खिडक्यांना जाड पडदे लावणं टाळा, जेणेकरून सूर्यकिरणं घरात प्रवेश करू शकतील. हिवाळ्यात बेडशीट, सोफा किंवा पडद्याचा रंग गुलाबी असावा. शक्य असेल तर तुम्ही या रंगाची क्रोकरीदेखील खरेदी करू शकता. कारण हा रंग खूप शुभ मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार, या रंगाच्या वस्तूंचा वापर केल्यास घरातले सदस्य आणि नातेवाईकांशी संबंध चांगले राहतात. थंडीच्या दिवसात किचनमध्ये उष्ण वस्तू, पदार्थ आवर्जून असावेत. तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा साजूक तुपातले लाडू किंवा असे अन्य कोणतेही पदार्थ किचनमध्ये ठेवू शकता. तसंच या ऋतूत शरीरात उष्णता निर्माण करणारे हरभरा किंवा गुळाचे पदार्थदेखील ठेवू शकता. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते.