JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / यंदाची अमरनाथ यात्रा 30 जूनपासून; पवित्र गुहेच्या आश्चर्यकारक गोष्टी जाणून घ्या!

यंदाची अमरनाथ यात्रा 30 जूनपासून; पवित्र गुहेच्या आश्चर्यकारक गोष्टी जाणून घ्या!

भारतीय संस्कृतीतल्या महत्त्वाच्या तीर्थयात्रांमध्ये अमरनाथ यात्रेचा समावेश होतो. यंदाची अमरनाथ तीर्थयात्रा 30 जूनपासून सुरू होणार असून, ती 43 दिवस सुरू असेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 जून : हिमालयाच्या (Himalaya) दुर्गम भागातल्या अमरनाथ यात्रेला (Amarnath Yatra) हिंदू संस्कृतीत खूप महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीतल्या महत्त्वाच्या तीर्थयात्रांमध्ये अमरनाथ यात्रेचा समावेश होतो. यंदाची अमरनाथ तीर्थयात्रा 30 जूनपासून सुरू होणार असून, ती 43 दिवस सुरू असेल. 11 ऑगस्ट 2022 रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी ही यात्रा संपेल. त्या निमित्ताने, या आश्चर्यकारक तीर्थस्थळाविषयी, तसंच तीर्थयात्रेविषयी सविस्तर माहिती घेऊ या. ‘एएसबी न्यूज इंडिया’ या पोर्टलने याबद्दलचं वृत्त, तसंच अमरनाथबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे. अमरनाथ हे वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे. दर वर्षी तिथे गुहेत बर्फाचं शिवलिंग (Shivalinga of Ice) नैसर्गिकरीत्या तयार होतं. श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेला हे बर्फाचं शिवलिंग पूर्णपणे तयार होतं. त्यानंतर येणाऱ्या अमावास्येपर्यंत त्याच्या आकारात बऱ्यापैकी घट होते. गुहेच्या छतातून गळणाऱ्या पाण्याच्या थेंबांपासून हे शिवलिंग तयार होतं. तापमान खूप थंड असल्यामुळे त्या पाण्याचं बर्फात रूपांतर होतं आणि तो बर्फ शिवलिंगाचा आकार घेतो. (Amarnath Pilgrimage) बर्फाच्या या मुख्य शिवलिंगाच्या डाव्या बाजूला बर्फाचीच दोन छोटी शिवलिंगंही तयार होतात. असं म्हटलं जातं, की ती शिवलिंगं म्हणजे पार्वती माता आणि भगवान श्री गणेश यांचं प्रतीक आहे. हे जगातलं असं एकमेव शिवलिंग आहे, की जे चंद्राच्या प्रकाशाच्या अनुषंगाने वाढतं आणि कमी होतं. बर्फापासून तयार होणारं शिवलिंग असल्याने त्याला ‘बाबा बर्फानी’ असंही म्हटलं जातं. अमरनाथ गुहेचा शोध महर्षी भृगू यांनी सर्वप्रथम लावला होता, असं मानलं जातं. एकदा काश्मीर खोरं पाण्यात बुडालं होतं, तेव्हा कश्यप ऋषींनी नद्या आणि नाल्यांच्या माध्यमातून पाणी बाहेर काढलं होतं. तेव्हा भृगू ऋषी तपस्येसाठी एकांतवासाच्या शोधात होते. तेव्हाच त्यांना बाबा अमरनाथाच्या पवित्र गुहेचं दर्शन झालं, असं सांगितलं जातं. 1850मध्ये बूटा मलिक नावाच्या एका मुस्लिम मेंढपाळाला अमरनाथ गुहेचा शोध लागला होता, असाही एक प्रवाद आहे. भगवान शिवशंकरांनी याच गुहेत पार्वतीला अमरत्वाचं रहस्य सांगितलं होतं, असं मानलं जातं. म्हणूनच या गुहेला अमरनाथ असं म्हटलं जातं. जो कोणी भक्त या गुहेत तयार झालेल्या शिवलिंगाचं दर्शन घेतो, त्याची जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते, असा भक्तांचा विश्वास आहे. अमरनाथमध्ये भगवान शिवशंकराच्या अद्भुत हिमलिंगासोबतच माता सतीचं शक्तिपीठही आहे. हा एक दुर्मीळ योगायोग आहे. 51 शक्तिपीठांपैकी एक असलेलं महामाया शक्तिपीठ याच गुहेत आहे. देवी सतीचा कंठ इथे पडला होता, अशी कथा सांगितली जाते. तसंच, शिव-पार्वतीची अमरकथा ऐकून अमर झालेलं कबुतर दाम्पत्यही इथे अनेकदा पाहायला मिळतं, असं सांगितलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या