मुंबई, 10 जानेवारी : तुम्ही तांदळाची खिचडी अनेकदा खाल्ली असेल पण छोड्याची खिचडीबद्दल क्वचित ऐकलं असेल. गव्हाला जाडसर भरडून त्यातील पीठ वेगळे करतात. त्याला जाड छोडे किंवा हिंदीमध्ये दलिया म्हणतात. या जाड रव्यापासून तांदळाच्या खिचडीप्रमाणेच छोड्याची खिचडी बनवली जाते. नंदूरबारच्या रिनल पाटील यांनी सांगितलेली छोड्याच्या खिचडीची रेसिपी आपण पाहूयात साहित्य आणि प्रमाण 1)छोड्या (दलिया) एक कप 2)मुगडाळ अर्धा कप 3)लसणाचे तुकडे- दहा लसूण पाकळ्यांचे तुकडे 4)लाल सुक्या किंवा हिरव्या मिर्ची दोन 5)मोहरी 6)हिंग 7)जिरे -फोडणीसाठी अंदाजानुसार 8)हळद 9)तिखट 10)मीठ अंदाजानुसार 11)कडीपत्ता 12)कोथिंबीर 13)टोमॅटो 14)कांदा 15)तेल. नाश्त्यासाठी करा क्रिस्पी आणि पौष्टिक गव्हाचा चिवडा, पाहा Video छोड्याची खिचडी बनविण्याची पद्धत सर्वप्रथम एका भांड्यात छोड्या (दलिया) गुलाबीसर भाजून घ्यावा.भाजल्यावर काढून बाजूला ठेवावे. फोडणीसाठी तेल तापवून त्यात मोहरी, लसणाचे तुकडे, लाल मिरची, हिंग ,मिरची, जिरे, हळद आणि तिखट टाकावे. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा,टोमॅटो व बटाटा टाकून परतवून घ्यावे. फोडणीत दीड ग्लास पाणी टाकून उकळून घ्यावे. मुगाची डाळ धुऊन उकळत्या फोडणीच्या पाण्यात टाकावी. आठ ते दहा मिनिटानंतर भाजलेला छोड्या (दलिया) टाकून चवीनुसार मीठ व आवडीनुसार कोथिंबीर टाकून मंद आचेवर शिजवून घ्यावे. त्यावर शेंगदाण्याचे कच्चे तेल टाकून कढी सोबत सर्व करावी.
छोड्याची खिचडी पचनाला हलकी असते व पौष्टिक असते. ही चटपटीत खिचडी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटते. तसेच विविध भाज्या असल्यामुळे या खिचडीचा स्वाद आणखी वाढतो.आजारी व्यक्तीला खायला दिल्यास त्याच्या तोंडाची चव बदलून जाते.