नवी दिल्ली, 14 जुलै : घरात सुख-समृद्धी राहावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. घरात प्रसन्न वाटावं यासाठी आपण सजावटीवर खूप खर्च करतो. परंतु, घराची रचना (Structure) सदोष असेल, घरात आवश्यक वस्तू चुकीच्या जागी ठेवल्या असतील तर कुटुंबातल्या सदस्यांना अडचणी, आजारपण, मानसिक अशांततेचा सामना करावा लागतो. घरात सुख-समृद्धी टिकत नाही, असं वास्तुशास्त्राचे (Vastu shastra) अभ्यासक सांगतात. त्यामुळे घराची रचना योग्य असणं तसेच प्रत्येक वस्तू दिशेनुसार ठेवणं आवश्यक आहे. अनेकदा आपण घरात तुटलेल्या, जुन्या वस्तू साठवून ठेवतो. यामुळेदेखील वास्तुदोष निर्माण होतो. घरात सजावट किंवा गरज म्हणून अनेक लोक आरसे (Mirror) लावतात. बऱ्याचदा काही कारणामुळे आरसा तुटतो, फुटतो. तुटलेला किंवा फुटका आरसा काढून न टाकता तसा ठेवणं अशुभ मानलं जातं. यामुळे घरात अनेक समस्या निर्माण होतात. `इंडिया टीव्ही`ने या विषयीची माहिती दिली आहे. प्रत्येक घरामध्ये आरसा असतोच. अनेकांना आरशाची खूप आवड असते. त्यामुळे लोकं वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर आरशांनी घर सजवतात. आरशाचा सर्वांत जास्त वापर महिला (Women) करतात. घरामध्ये आरसा लावणं हे शुभ मानलं गेलं आहे. परंतु, घरात फुटलेला आरसा असेल तर तो अशुभ फलदायी ठरतो. तसंच घरामध्ये आरसा लावण्यासाठी एक विशिष्ट दिशा वास्तुशास्त्रात नमूद करण्यात आली आहे. तुटलेला, फुटलेला आरसा तसाच ठेवला तर घरामध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. कुटुंबातल्या सदस्यांना (Family Members) अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच असा आरसा घरात ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा (Positive Energy) कमी होते आणि नकारात्मक ऊर्जा वाढू लागते. फुटलेल्या आरशावर कोणत्याही स्वरुपाचा प्रकाश पडत असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा वेगानं पसरते. तसंच यामुळे नकारात्मक स्पंदनं तयार होऊ लागतात. या गोष्टीचा परिणाम कुटुंबातल्या सदस्यांच्या मानसिकतेवर होऊ शकतो. त्याचप्रमाणे कुटुंबातल्या सदस्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी वाढू शकतात. घरातल्या आरशाच्या अनुषंगाने काही सूचक गोष्टीही समजू शकतात, असं अभ्यासकांचं मत आहे. जर घरातील आरसा अचानक तुटला किंवा फुटला तर यामुळे कुटुंबावर येणारं एखादं मोठं विघ्न, समस्या टळली असं मानलं जातं. त्यामुळे असा तुटका, फुटका आरसा तातडीने घराबाहेर फेकून द्यावा. घरात कोणतीही तुटकी, खराब झालेली किंवा फुटलेली वस्तू दीर्घकाळ ठेवू नये. घरातला आरसा जर फुटला किंवा तुटलेला असेल तर तो तातडीनं घराबाहेर फेकून द्यावा, अन्यथा घरामध्ये समस्या वाढून सुख-समृद्धी नष्ट होऊ शकते. तसेच खराब वस्तूंची देखील लगेच विल्हेवाट लावावी,`` असा सल्ला वास्तुतज्ज्ञ आचार्य इंदू प्रकाश यांनी दिला आहे.