गर्भवती महिलांसाठी आहार
मुंबई, 21 जानेवारी : आई होण्याचे स्वप्न पाहण्यापासून ते आई होण्यापर्यंतचा प्रवास स्त्रीसाठी खूप रोमांचक, भावनिक आणि जबाबदार असतो. यादरम्यान नवीन जीवनासाठी शरीरात होणाऱ्या बदलांसोबतच चांगल्या आयुष्याची कल्पनाही येते. आईच्या आरोग्यासाठी आणि बाळाच्या विकासासाठी गर्भधारणेपासून नवव्या महिन्यापर्यंत गर्भवती महिलेच्या आहाराची अत्यंत काळजी घेतली जाते. कारण ते तिच्या न जन्मलेल्या बाळाला पोषण देते. मात्र कधी-कधी वेगवेगळ्या ठिकाणच्या अन्नाबद्दलच्या वेगवेगळ्या समजुती, वडिलधाऱ्यांचे अनुभव, डॉक्टरांचे सल्ले आणि स्वत: गर्भवती महिलेच्या आवडी-निवडी यांमुळे योग्य आणि पौष्टिक आहार निवडणे फार कठीण होऊन बसते. अशा परिस्थितीत गर्भवती महिलांसाठी आयुर्वेदाने सांगितलेला हा पौष्टिक आहार खूप फायदेशीर ठरू शकतो. आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मेडिकल हेरिटेज (सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस) द्वारे जारी केलेल्या मार्गदर्शकामध्ये न्यूट्रीशनल ऍडव्होकेसी इन आयुर्वेदमध्ये खाण्यापिण्याबद्दल तपशीलवार स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यामध्ये गरोदर महिलांनी पहिल्या महिन्यापासून ते नवव्या महिन्यापर्यंत काय खावे, हेही सांगण्यात आले आहे. आरोग्य सुधारण्यासाठी आणि रोगांपासून बचाव करून निरोगी ठेवण्यासाठी आयुर्वेद नेहमीच पौष्टिक आहारावर भर देत आला आहे. आयुर्वेदानुसार निरोगी जीवन जगण्यासाठी अन्न ही महत्त्वाची गरज आहे. गर्भवती महिलेचा आहार हा गर्भातील बाळाच्या विकासासाठी आणि आरोग्यासाठी जबाबदार असतो, त्यामुळे आयुर्वेदाच्या या शिफारसींचा अवलंब करणे खूप फायदेशीर ठरू शकते. गर्भवती महिलांसाठी आहार पहिला महिना - पहिल्या महिन्यात महिलांनी थंड दूध आणि पौष्टिक अन्न खावे. ज्यामध्ये फळे, भाज्या, डाळी इत्यादी घेता येतात. दुसरा महिना - या महिन्यात गरोदर स्त्रिया शतावरी हे आयुर्वेदिक औषध दुधासोबत घेऊ शकतात. तसेच हंगामी फळे, भाज्या, दूध, दही, रोटी खाऊ शकतात. शतावरी प्रजनन क्षमता वाढवण्यासोबत जीवनसत्वाची कमतरता पूर्ण करते. याशिवाय बाला म्हणजेच सिडा कॉर्डिफोलिया देखील घेता येते. शरीरातील शक्ती, ऊर्जा, हाडे आणि सांधे यांची ताकद वाढवणारे हे औषध आहे. तिसरा महिना - या महिन्यात महिलांनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ अवश्य घ्यावेत. यामध्ये दही, पनीर, ताक, तूप यांचा समावेश आहे. याशिवाय या महिन्यापासून मध घेणे सुरू करा. रोज थंड दुधात मध घ्या. हे आई आणि बाळ दोघांसाठीही फायदेशीर आहे. पौष्टिक आहार घ्या. चौथा महिना - चौथ्या महिन्यात दूध घेण्यासोबत लोणी खाणे खूप फायदेशीर आहे. ताक पिणे देखील फायदेशीर आहे. तसेच हंगामी फळे, भाज्या, सॅलड्स, ज्यूस घेत राहा. पाचवा महिना - गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यात भरपूर दूध आणि तूप घ्या. सहावा महिना - या महिन्यात दूध, तूप, गोड पदार्थ, गोड फळे, धान्ये इत्यादींचे सेवन करावे. सातवा महिना - सातव्या महिन्यात भरपूर दूध प्या. यासोबत दुधात तूपही घेऊ शकता. या महिन्यात तुपाचे सेवन करावे. आठवा महिना - या महिन्यात गर्भाचे वजन वाढू लागते. या महिन्यात दुधाची लापशी तूप मिसळून खावी. लापशी गहू किंवा बार्लीची असू शकते. नववा महिना - या महिन्यात शिजवलेला भात तुपासोबत खाऊ शकतो. जर कोणी मांसाहारी असेल तर ती तूप घालून मांसाचे सूप देखील पिऊ शकते. प्रसूतीनंतर हे पदार्थ खा प्रसूती किंवा प्रसूतीनंतर लगेच स्त्रीला दूधविरहित आणि औषधी किंवा दुधाची लापशी दिली जाऊ शकते, असे आयुर्वेदाने सांगितले आहे. त्यात बार्ली किंवा गहू लापशी असू शकते. याशिवाय हरभरा डाळ किंवा बार्ली घालूनही भात देता येतो. मात्र या गोष्टी पचनशक्तीच्या जोरावरच द्याव्यात. मूग डाळ पाणी, हरभरा डाळ, जव किंवा गव्हाची लापशी, पुरेशा प्रमाणात तूप आणि तेल स्त्रीला द्यावे. जिरे, सुंठ, काळी मिरी आणि पिंपळ घालून त्यांचा आहार तयार करावा. प्रसूतीनंतर आठ दिवसांनी स्त्रीला सामान्य आहार दिला जाऊ शकतो. मात्र यासोबत मेथीचे लाडू किंवा सुक्या आल्याचे लाडूही बनवता येतात जेणेकरून बाळाला पुरेशा दुधासोबतच आईलाही पोषण मिळू शकेल.