नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : आज 19 ऑगस्ट रोजी जगभरात ‘जागतिक छायाचित्रण दिन’ साजरा केला जात आहे. या दिवशी छायाचित्रण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित केले जाते. याबाबतीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही चांगले फोटो घेणाऱ्या छायाचित्रकारांना प्रोत्साहित करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वत:ला फोटोग्राफीची आवड आहे. राजकीय जीवनात असतानाही त्यांनी आपल्या फोटोग्राफीचा छंद जपला आहे. त्यांचे मित्र-सहकारी त्यांच्या फोटोग्राफीचे आजही कौतुक करतात. पीएम मोदींना फोटोग्राफीबद्दल खूप प्रेम आणि आपुलकी आहे. नरेंद्र मोदींचे सोशल मीडिया अकाउंट बघून देखील हे कळू शकते. कधी सेलेब्स सोबत तर कधी सर्व सामान्यांसोबत सेल्फी घेताना पंतप्रधान मोदी दिसतात. पंतप्रधान असले तरी अनेकदा ते स्वत: कॅमेरा हातात धरून फोटोग्राफी करू लागतात. फोटोग्राफर हर्ष शहा यांनी सांगितले, पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी एक चांगले फोटोग्राफर आहेत. आम्ही जेव्हा भाजप कार्यालयामध्ये भेटत होतो तेव्हा त्यांनी सांगितले होते की, जेव्हा खूप ऍडव्हान्स कॅमेरा लेन्स नव्हते त्यावेळीही त्यांनी कैलास मानसरोवर यात्रा केली होती आणि तेथील फोटो काढले होते. त्यावेळचे त्यांचे फोटो खरंच पाहण्यासारखे आहेत आणि फोटो प्रदर्शन करण्याइतपत ते चांगले आहेत. तसेच एखाद्या छायाचित्रकाराचा चांगला फोटो वर्तमानपत्रात छापून यायचा, त्यावेळी ते त्याला अधिक प्रोत्साहित करायचे. ज्येष्ठ पत्रकार उदय माहूरकर यांनीही सांगितले की, नरेंद्र भाई मोदी चांगले फोटो काढणाऱ्यांचे नेहमी कौतुक करत असायचे. गुजरातमध्ये एकदा दुष्काळ पडलेला असताना दुष्काळाची भीषणता दर्शवणारा एक फोटो इंडिया टुडेमध्ये प्रसिद्ध झाला होता. विहिरीत खाली उतरून छायाचित्रकाराने वरती पाणी काढतानाचा एक फोटो घेतला होता, त्या फोटोवरून नरेंद्र मोदी यांनी संबंधित शैलेश नावाच्या छायाचित्रकाराला फोन करून त्याचे कौतुक केले होते.
ज्येष्ठ छायाचित्रकार दिलीप ठाकर, यांनी सांगितले की सध्या नरेंद्र मोदी पंतप्रधान असली तरी त्यांच्यातील छायाचित्रकार आणि त्यांचा फोटो सेंन्स कायम आहे. पीएम मोदींच्या इंस्टाग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये पीएम मोदी नंदनवन नवीन रायपूरला गेले होते. तिथे त्यांनी स्वतः वाघाचा फोटो काढला आणि तो आपल्या सोशल मीडियावर शेअरही केला. हे वाचा - मोठी कारवाई; यामुळे लाखो सबस्क्राइबर्स असलेल्या 8 YouTube न्यूज चॅनेलवर बंदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशात गेले असताना त्यांनी तेथे त्यांनी पर्वतांची उत्कृष्ठ छायाचित्रे घेतली होती. तसेच 2014 मध्ये पीएम मोदी आसियान शिखर परिषदेला गेले होते. तेव्हा तिथे त्यांनी मोबाईलवरून फोटो काढले होते. मोबाईल कॅमेऱ्यामुळे सेल्फी घेण्याचा ट्रेंड सुरू झाला. आता बहुतेकजण भेटल्यावर सेल्फी घेण्यापासून मागे हटत नाहीत. पीएम मोदींनीही अनेकदा असे सेल्फी घेतली आहे. बेअर ग्रिल्सने त्यांच्यासोबत घेतलेला सेल्फी खूप व्हायरल झाला होता.