विविध रोगांवर रामबाण औषध आहे तुळस
हिंदू धर्मात तुळशीला फक्त एका रोपाच्या दृष्टीनं न पाहता देवाच्या स्थानी मानून तिची पूजा केली जाते. ग्रामीण भागात जवळपास प्रत्येकाच्या घरासमोर तुळशीचं वृंदावन असतं. शहरांमध्ये अनेकांकडे वृदावनं नसली, तरी तुळशीचं रोपटं मात्र असतंच. ज्यांच्याकडे जागेची समस्या आहे, त्यांच्याकडे छोट्याशा कुंडीत का होईना, तुळस असतेच; पण तुम्हाला माहिती आहे का, तुळशीला धार्मिक महत्त्व आहेच, त्यासोबतच ती औषध म्हणून विविध आजारांवर एक रामबाण उपाय आहे. आयुर्वेदाने तुळशीच्या औषधी गुणांचा वापर उपचारांसाठी केला आहे. तुळशीच्या औषधी गुणधर्मामुळे, अनेक आयुर्वेदिक आणि निसर्गोपचार हॉस्पिटलमध्ये तिचा औषध बनवण्यासाठीही वापर केला जातो. या ‘मेडिकल हर्ब’ अर्थात औषधी वनस्पतीच्या अनेक जाती आहेत. त्यापैकी ‘राम तुळस’ आणि ‘कृष्ण तुळस’ सर्वांत लोकप्रिय आहेत. पण या दोन्ही प्रकारच्या तुळशींमध्ये नेमका काय फरक आहे? चांगल्या आरोग्यासाठी कोणत्या तुळशीची निवड करावी? याबाबतची माहिती तुमच्यापैकी बरेच जणांना नसेल. चला तर, आज आपण जाणून घेऊया राम तुळस आणि कृष्ण तुळस यातील नेमका फरक काय आहे. दोन्ही तुळशींचे औषधी फायदे तज्ज्ञांच्या मते, ‘दोन्ही तुळशींचे औषधी फायदे आहेत.’ फिटनेस एक्स्प्रेसचे संचालक अंकित गौतम म्हणाले, ‘दोन्ही तुळशी पचन आणि रोगप्रतिकारशक्ती, ताप, त्वचारोग बरा करण्यासाठी वापरल्या जातात. चिंता आणि तणाव कमी करण्यासाठीदेखील याचा वापर काहीजण करतात. वजन कमी करण्यासाठी तुळशीची पानं टाकलेलं पाणी वापरलं जातं, असंही एका संशोधनातून समोर आले आहे. याच्या सेवनानं सर्दी-खोकलाही दूर होतो. तुळशीची दोन-तीन पानं रोज रिकाम्यापोटी खावीत. तुळशीची पानं वापरून चहा किंवा काढा बनवता येतो. तुळशीच्या पानांचं सेवन केल्यामुळे रक्त स्वच्छ होण्यासही मदत होते,’ असेही गौतम यांनी सांगितलं. हेही वाचा - पहिल्यांदा डेटवर जाताना चुकूनही करू नका ‘या’ चुका, नाहीतर नात्यावर होईल परिणाम निसर्गाची देणगी वेद क्युअरचे संस्थापक आणि संचालक विकास चावला यांनी तुळस ही फायदेशीर आणि निसर्गाची देणगी असल्याचं सांगितलं. ते म्हणाले,‘राम तुळशीला हिंदू धर्मात विविध आजारांवरील रामबाण औषध म्हटलं जातं. धार्मिक पूजेसाठी या तुळशीचा वापर केला जातो. ही तुळस पचनासाठी फायदेशीर आहे.’ तर कृष्णा तुळशीबद्दल माहिती देताना चावला म्हणाले,‘कृष्ण तुळस जांभळ्या पानाची तुळस म्हणूनही ओळखली जाते. या तुळशीचा वापर कमी असला तरी तिचे अनेक औषधी फायदेही आहेत. त्वचारोग आणि इतर विविध आजारांवर ती एक रामबाण उपाय आहे.’ राम तुळस एक नैसर्गिक इम्युनिटी बूस्टर आहे. ती तणाव आणि हाय बल्डप्रेशर कमी करण्यासाठी वापरली जाते. त्यात कॅन्सरविरोधी गुणधर्म आहेत, आणि ती पचन सुधारण्यास मदत करते. तर, कृष्ण तुळस बऱ्याचदा ज्या लहान मुलांना सर्दी-खोकल्याचा त्रास असेल, त्यांना खायला दिली जाते. तापावरही हे एक रामबाण औषध आहे. त्यातील अँटिऑक्सिडंट गुणधर्म हृदयाच्या समस्या आणि मधुमेहासाठीदेखील चांगले आहेत. या तुळशीच्या सेवनामुळे त्वचा चमकदार होण्यास आणि केसांची लांबी वाढण्यास मदत होते. हेही वाचा - Tulasi Vivah 2020 : तुळशी विवाहाच्या दिवशी करा हे उपाय; वैवाहिक आयुष्यातील समस्या होतील दूर या तुळशीची पानं असतात गोड राम तुळस आणि कृष्ण तुळस यांच्यातील फरक स्पष्ट करताना बेंगळुरु येथील अपोलो हॉस्पिटलच्या प्रमुख आहारतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी सांगितलं की, ‘राम तुळशीचा वापर बहुतेक पूजेत केला जातो. ही तुळस तिच्या औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. राम तुळशीच्या पानांची चव गोड असते. तर, कृष्ण तुळशीची पानं हिरवी व जांभळ्या रंगाची असतात. या तुळशीच्या पानांची देठं जांभळ्या रंगाची असतात.’ दरम्यान, घराच्या अंगणात आणि बाल्कनीत लावली जाणारी तुळस हिंदू धर्मात पवित्र मानली जाते. पण तुळस हे फक्त एक रोप नसून तिच्यातील अनेक औषधी गुणधर्मांमुळे गंभीर रोगांशीदेखील सामना करणं सोपं होतं.