टोकियो, 15 फेब्रुवारी : माणूस हा समाजशील प्राणी आहे, हे आपल्याला माहिती आहे; पण कोरोनाच्या (Coronavirus) साथीमुळे एकमेकांपासून अंतर राखणं हे ‘न्यू नॉर्मल’ बनलं. आता परिस्थिती हळूहळू सुधारत असली, तरी जवळपास वर्षभराच्या कठोर निर्बंधांमुळे एकटं किंवा आपल्या माणसांपासून दूर राहावं लागल्यामुळे जगभरात अनेकांना मानसिक समस्या (Mental Health Problems) निर्माण झाल्या. या समस्येशी लढण्यासाठी ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय केले जात आहे. जपानमध्ये तर चक्क एकटेपणा दूर करण्यासाठी मंत्र्याचीच नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान योशिहिदे सुगा (Yoshihide Suga) यांनी एकटेपणा आणि सामाजिक दुराव्यामुळे आलेल्या समस्या दूर करण्यासाठी Minister of Loneliness ची नियुक्ती केली आहे. सोशल डिस्टन्सिंग, प्रवासावर निर्बंध, सामाजिक कार्यक्रमांवर बंदी यामुळे अनेक व्यक्तींच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम झाले. अनेकांना एकटेपणा वाटू लागला. जपानमध्ये कोरोना महामारीनंतर आत्महत्यांमध्ये वाढ झाली. जपान टाइम्सच्या वृत्तात म्हटल्यानुसार, पूर्वीपासूनच जपानमधला आत्महत्यांचा दर (Suicide Rate) जगात सर्वाधिक आहे. गेल्या दशकात अनेक प्रयत्नांनंतर हा दर कमी झाला होता. मात्र महामासाथीमुळे त्या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरवलं. 2020 मध्ये जपानमधल्या (Japan) 20 हजार 919 जणांनी आत्महत्या केल्याचं सरकारी आकडेवारी सांगते. ही संख्या 2019 च्या तुलनेत 3.7 टक्क्यांनी अधिक आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सुगा यांनी प्रादेशिक पुनरुज्जीवन मंत्री तेत्सुशी साकामोटो यांची लोनलिनेस मिनिस्टर (Loneliness Minister) म्हणून हंगामी नियुक्ती केली आहे. नागरिकांना वाटणारा एकटेपणा आणि सामाजिक दुरावा यांमुळे उद्भवणाऱ्या मुद्द्यांवर काम करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे वाचा - प्रत्यारोपणासाठी हृदयाची प्रतीक्षा संपली; शरीरात धडधडणार Total Artifical Heart 2020 मध्ये पुरुषांच्या तुलनेत अधिक महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. दुरावा आणि संबंधित कारणांमुळे महिलांना पुरुषांच्या तुलनेत ताणाचा त्रास अधिक झाला आहे. सुगा यांनी साकामोतो यांना बैठकीत सांगितलं, की ‘पुरुषांच्या तुलनेत महिलांना ताणाचा त्रास अधिक होतो. त्यामुळे आत्महत्यांचं प्रमाण वाढतंआहे. तुम्ही समस्या ओळखून योग्य ती धोरणं आखाल, अशी मला आशा आहे.’ या गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी, त्यावर उपाय शोधण्याकरिता फेब्रुवारी महिन्यात तज्ज्ञांच्या इमर्जन्सी फोरमचं आयोजन करण्याचंही जपानच्या पंतप्रधानांनी ठरवलं आहे. एकटेपणा दूर करणाऱ्या उपक्रमांना नागरिकांमध्ये प्रोत्साहन देणार असल्याचंही जपानच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे. हे वाचा - बॉलिवूड हादरलं! आणखी एका अभिनेत्याचा मृत्यू; फेसबुकवर म्हणाला, आता सहन नाही होत एकटेपणाच्या समस्येवर धोरण आखणारा जपान हा एकमेव देश नाही. 2018 मध्ये ब्रिटन सरकारने ज्येष्ठ नागरिकांमधल्या एकटेपणाच्या समस्येवर उपाय काढण्यासाठी लोनलिनेस मिनिस्टरची नेमणूक केली होती. जपानमध्ये ही समस्या सर्व वयोगटांच्या, सर्व पिढ्यांच्या आणि सर्वलिंगी व्यक्तींमध्ये आढळत असल्याने ती समस्या अधिक गंभीर आहे.